शाळा सुरू होऊन महिना होत आला तरी गणवेश न मिळाल्याने बुधवारी एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उपराजधानीत घडली. शासनाकडून गणवेश, पाठय़पुस्तके आणि इतर साहित्य मोफत दिले जाते, याचा वेळोवेळी डांगोरा पिटला जातो. मात्र, या घटनेने शासनाच्या कारभाराचे पितळ उघडले पडले आहे.

रितू गजानन ढाकुलकर असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती रविनगरातील सी.पी. अ‍ॅण्ड बेरार हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकत होती.

शाळा १५ जूनला सुरू झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळतील, असे शासनाकडून सांगण्यात आले. मात्र, एक महिन्याचा कालवधी लोटूनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत. गेल्या एक महिन्यापासून रितू शाळेच्या गणवेशाविनाच शाळेत जात होती. शिक्षकांनीही तिला गणवेश देणार असल्याचे कबूल केले. तसेच ढाकुलकर कुटुंबीयदेखील तिला शाळेतून गणवेश मिळेल, या आशेवर होते. इतर सर्व मुलांना गणवेश मिळाले, केवळ मलाच मिळाला नाही, ही बाब तिच्या मनाला टोचत होती. तिने अनेकदा तिच्या आईकडेही गणवेशाची मागणी केली. शाळेतील काही मुले तिला चिडवत असल्याने ती आणखी खिन्न झाली होती. या नैराश्येतूनच फाशीचा विचार तिच्या डोक्यात आला असावा.

 

*************************************

 

टीईटीचा निकाल दीड टक्का

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) पहिल्या भागाचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून मराठी माध्यमाचा निकाल १.४४ टक्के, इंग्रजी माध्यमाचा ०.७४ टक्के आणि उर्दू माध्यमाचा निकाल ०.२२ टक्के लागला आहे. राज्यात डिसेंबर २०१५ मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. दोन भागांत होणाऱ्या या परीक्षेची पहिल्या भागाची प्रश्नपत्रिका फुटल्याने ही परीक्षा पुन्हा घेण्यात आली.