नागपूर : क्रिकेट खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना अजनीतील ओंकारनगर मैदानात सोमवारी सकाळी घडली. रमन दिलीप गायकवाड (२५) रा. धाडीवाल लेआऊट, असे मृताचे नाव आहे. तो बीसीए अंतिम वर्षांला शिकत होता. सोमवारी सकाळी रमन व त्याचे मित्र ओंकारनगर मैदानात क्रिकेट खेळत होते. अचानक रमन याची प्रकृती खालावली. मित्रांनी त्याला घरी नेले. नातेवाईकांनी रमनला रामदासपेठेतील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून रमन याला मृत घोषित केले. रमनचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.