बजेरिया परिसरातील हृदयद्रावक घटना

नागपूर : शाळेतून घरी सोडणाऱ्या स्कूलबसनेच बसमधून खाली उतरलेल्या मुलाला चिरडल्याची धक्कादायक घटना बजेरिया परिसरात शुक्रवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने विरथ झाडे या विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूची आठवण करून दिली.

students election duty marathi news
निवडणुकीच्या कामासाठी आता विद्यार्थ्यांचीही नियुक्ती
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण
Race for immersion on Rangpanchami in the five rahadis of the Peshwa era
नाशिकमध्ये रहाडींमध्ये डुंबण्याची चढाओढ यासाठी…
navi mumbai, 12 year old boy killed
शरीर सूखासाठी १२ वर्षीय बालकाचा खून, नवी मुंबई पोलिसांनी १६ तासांत मारेकऱ्याला ताब्यात घेतले

यश भोलानाथ मिश्रा (८ वर्षे) रा. तेलीपुरा, बजेरिया असे मृत मुलाचे नाव आहे. त्याचे वडील रेल्वेस्थानकावर मजुरी करीत असून आई गृहिणी आहे. त्याला पिहू नावाची लहान बहीण आहे. यश हा मोहननगर, गड्डीगोदाम परिसरातील ऑरेंज सिटी हायस्कूलमध्ये तिसऱ्या वर्गात शिकत होता. आई-वडील व बहिणीसह तो नागोबा मंदिरजवळ तेलीपुरा येथे राहायचा. शाळेसाठी दररोज तो स्कूलबसमधून ये-जा करायचा. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ९ वाजता घरून शाळेत गेला. दुपारी ३ वाजता शाळा सुटल्यानंतर तो एमएच-४०, बीएन-३६२० क्रमांकाच्या आपल्या बसने घरी येण्यासाठी निघाला. या बसमधून दररोज ४० वर विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास बस बजेरिया परिसरात पोहोचली. मीरा किराणा दुकानाजवळ बस थांबली व तेथे यशसह दोघेजण उतरले.  दरम्यान, यश हा घरी जाण्याकरिता बसच्या पुढील भागातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत होता. तेव्हा बसचालकाला तो न दिसल्याने त्याने बस समोर घेतली असता त्याला धक्का लागला व तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर बसचे मागील चाक त्याच्या डोक्यावरून गेले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार बघून चौकातच असलेल्या पानठेला चालकाने आरडओरड केली व परिसरातील लोक गोळा झाले. यशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी यशचे काका हरकलाल मिश्रा यांच्या तक्रारीवरून बसचालक प्रफुल्ल गजानन मथुरे (२६) रा. नारा याच्याविरुद्ध निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरण्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

विरथ झाडेच्या अपघाताची आठवण

या अपघाताने विरथ झाडे याच्या अपघाताची आठवण करून दिली. ९ जानेवारी २०१३ रोजी शाळेच्या बसमधून खाली उतरताना चाकाखाली येऊन नागपूरच्या विरथ झाडे या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची दखल घेऊन उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत: जनहित याचिका दाखल करून घेतली. या याचिकेवरील आजवर देण्यात आलेल्या विविध निर्देशांमुळे स्कूलबसची नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य झाले. तसेच शाळांमध्ये स्कूलबससाठी समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले व स्कूलबसवर चालकासह एक वाहन अनिवार्य असून मुले व त्यांच्या पालकांची भ्रमणध्वनी क्रमांक यादी, प्राथमिक औषधोपचार किट अनिवार्य करण्यात आली. या घटनेची आठवण आज झाली.

बसचालकानेच यशला रुग्णालयात नेले

हा अपघात घडल्यानंतर आरडाओरड  झाली. त्यावेळी प्रफुल्लने बस थांबवली व तो गाडीतून उतरला. त्यावेळी बसमध्ये जवळपास १५ ते २० विद्यार्थी होते. पण, त्याने बस व मुलांना सोडून यशला उचलले व तेथील स्थानिक नागरिकांच्या मोपेडने मेयो रुग्णालयात धाव घेतली. पण, तोपर्यंत यशचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

वाहक नसल्याने घडला अपघात

प्रफुल्ल चालवत असलेला बस ही त्याच्या वडिलांच्या मालकीची असून ऑरेंज सिटी हायस्कूलचे विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी शाळेशी करार झाला आहे.प्रफुल्ल हा बसचालक म्हणून काम करतो तर त्याची पत्नी बसमध्ये वाहक म्हणून काम पाहते. पण, तिची प्रकृती खराब असल्याने तिने आज सुटी घेतली होती. त्यामुळे प्रफुल्ल एकटाच मुले सोडण्यासाठी निघाला. वाहक असता तर कदाचित हा अपघात टळला असता व यशचे प्राण वाचले असते.