निसर्गाचा घटक असणारी व्यक्ती जेव्हा त्या निसर्गाच्या अधिक जवळ जाते आणि हृदयापासून निसर्गाच्या संवर्धनाचे कार्य करते, तेव्हा त्यातून होणारी फलनिश्चिती अद्भूतच असते. अलीकडच्या काही वर्षांत निसर्गाला समजून घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे. विद्यार्थी दशेपासूनच त्यांच्यात निसर्ग संवर्धनाचे संस्कार रुजविले जात आहेत. निसर्गात रमणाऱ्या एका विद्यार्थिनीने सध्या सर्व पर्यटकांच्या हृदयस्थानी असणाऱ्या वाघावर महाशब्दकोडे तयार केले आहे. जगातील सर्वात मोठे ‘वाघ’ शब्दकोडे असण्याचा अंदाज तिने व्यक्त केला असून त्यावर अजून शिक्कामोर्तब व्हायचे आहे.
जंगल आणि व्याघ्र संवर्धनासाठी स्वयंसेवींच्या मदतीने वनखाते कार्य करीत असतानाच, विद्यार्थ्यांच्या मनातसुद्धा जंगल आणि वन्यजीवसंवर्धनाचे बीज रोवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची ‘व्याघ्रदूत’ म्हणून दरवर्षी निवड केली जाते. २०१४ साली सांदीपनी शाळेची विद्यार्थिनी मनोज्ञा वैद्य हिचीसुद्धा ‘व्याघ्रदूत’ म्हणून निवड केली गेली. सुरुवातीपासूनच निसर्गात रमणाऱ्या मनोज्ञाने ‘व्याघ्रदूत’ ही जबाबदारी अंगावर येताच त्यादृष्टीने जंगल आणि वन्यजीवांविषयीची कर्तव्ये पार पाडण्यासदेखील सुरुवात केली. अभयारण्य, व्याघ्र प्रकल्पात जाऊन ही कर्तव्ये समजून घेत असतानाच वाघाविषयीची विविध माहिती शब्दकोडय़ातून का मांडू नये, असा प्रश्न तिला पडला. त्यादृष्टीने तिने तयारीसुद्धा सुरू केली.
वनखात्याकडून व्याघ्रदूत म्हणून निवड झाल्यानंतर अभयारण्य, व्याघ्रप्रकल्पाची भ्रमंती करताना त्या त्या ठिकाणाहून मनोज्ञाने वाघांविषयची इत्यंभूत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. कधी विकीपीडियाचा आधार तर कधी प्रसारमाध्यमांमध्ये दिल्या बातम्यांमधून मिळणारी माहिती टिपण्याचा उपक्रम तिने सुरू केला. तब्बल दोन वर्ष तिने या उपक्रमावर मेहनत घेतली. वाघाबद्दल सखोल माहिती दडलेले हे कदाचित पहिलेच शब्दकोडे असावे. बोर व्याघ्र प्रकल्पात झालेल्या ‘कीड्स फॉर टायगर’ शिबिरात वाघाचे महत्त्व सांगणाऱ्या स्वरचित कविता तिने सादर केल्या. तिच्या कविता वनखात्याने प्रकाशित करण्याचा मानस व्यक्त केला आहे. मनोज्ञाने तिच्या यशाचे श्रेय प्राचार्या शांती मेनन व आईवडिलांना दिले आहे.
* व्याघ्र संवर्धनाविषयीच्या जनजागृतीसाठी शब्दकोडे ही मनोज्ञाची नवनिर्मिती ठरली आहे. हे शब्दकोडे ११२ शब्दांचे असून याचीलांबी ५९७ सेंटीमीटर व रुंदी ५४.५ सेंटीमीटर आहे.
* ‘तरुण व्याघ्रदूत’ म्हणून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये तिची नोंद झाली आहे.
* रामन विज्ञान केंद्रात तिने सादर केलेल्या ‘मॉस्किटो ट्रॅप’ या प्रयोगाची व ‘अर्थक्विक’ या प्रतिकृतीची नोंद भारत आणि अमेरिकेतील ‘रेकॉर्ड बुक’मध्ये करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 13, 2016 1:51 am