तंबाखूमुक्त शाळा अभियानांतर्गत गुरुवार, १४ नोव्हेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त बालदिनाचे औचित्य साधून जिल्ह्य़ातील विविध शाळांमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्त समाज निर्मितीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याची शपथ घेतली. कार्यक्रमाचे आयोजन सलाम मुंबई फाऊंडेशन आणि आरोही बहुद्देशीय संस्था, नागपूर यांच्यातर्फे करण्यात आले.

राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्य सरकारच्या शिक्षण विभागातर्फे राज्यभरात या धोरणाची अंमलबजावणी होत आहे. जवाहरलाल नेहरू प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा, वाडी आणि धरमपेठ इंग्लिश मिडीयम शाळा, डिफेन्स या शाळांतील विद्यार्थ्यांना दिवेश कुमार यांनी तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम आणि जीवघेण्या आजारापासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन केले. तंबाखूमुक्त समाज निर्माण करण्यासाठी जनजागृती करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.