विद्यापीठाने दबावाखाली परीक्षा रद्द केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने करोनाचे कारण पुढे करीत एक वर्षांपासून रखडलेली बी.एड. अभ्यासक्रमाची परीक्षा पुन्हा पेपरच्या एका तासाआधी रद्द करीत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे करोना काळात जेईईसह अन्य परीक्षा सुरू असताना नागपूर विद्यापीठ कुणाच्या दबावात परीक्षा रद्द करीत आहे, अन्य विभागांच्या परीक्षा आणि नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांसाठी करोनाचे नियम वेगळे आहेत का, असा सवाल केला जात आहे.

डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमीमध्ये बी.एड. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे केंद्र होते. मात्र, महाविद्यालयातील प्राध्यापक व काही कर्मचाऱ्यांना करोना झाल्याने महाविद्यालय ‘सील’ करण्यात आले आहे. त्यामुळे या केंद्रावरील ६०० परीक्षार्थींचे केंद्र बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज बुधवारी दुपारी २ वाजता विद्यार्थ्यांची परीक्षा होती. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रही गाठले. मात्र, अचानक विद्यापीठाने परीक्षा रद्द होत असल्याचे एक तासाआधी जाहीर केले. त्यामुळे आता पुढील आदेशापर्यंत २४ आणि २६ फेब्रुवारीचा पेपर रद्द करण्यात आला आहे. मात्र, सध्या जेईई मुख्य परीक्षा सुरू आहे. याशिवाय अन्य विभागांच्या स्पर्धा परीक्षाही घेतल्या जात आहेत. असे असताना केवळ नागपूर विद्यापीठ प्रशासनालाच करोनाची भीती का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दीड वर्षापासून प्रतीक्षा का?

२०१९-२० मध्ये बी.एड.च्या प्रवेशप्रक्रियेला विलंब झाल्यामुळे हिवाळी २०१९ ची प्रथम सत्राची परीक्षा १६ मार्च २०२०ला सुरू झाली होती. मात्र, पहिला पेपर होताच टाळेबंदीची घोषणा करण्यात आल्याने परीक्षा रद्द झाली होती. ही परीक्षा हिवाळी २०१९ची असल्याने विद्यापीठाला साथ प्रतिबंधक कायद्यानुसार या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात सरळ प्रवेश देणेही अशक्य आहे. त्यांची प्रथम सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर करून त्या आधारे द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांना तिसऱ्या सत्रात प्रमोट करता येणार आहे. या सर्व अडचणीमुळे बी.एड.प्रथम सत्रांतची परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठामध्ये डॉ. वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून यानुसार ९ ते ११ नोव्हेंबर २०२० दरम्यान, परीक्षेचे आयोजन केले होते. मात्र, करोनामुळे ही परीक्षा पुन्हा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा करोनाचे कारण समोर करून परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मन:स्ताप होत आहे.

कुणाच्या दबावात हा निर्णय घेतला व परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांना ऐन वेळेवर परत का जावे लागले, याचा खुलासा नागपूर विद्यापीठ प्रशासनाने करावा. करोनाचे कारण असेल तर नागपुरातील परीक्षा केंद्रांवर सुरू असलेल्या जेईई आणि यूपीएससीच्या परीक्षांसाठी वेगळे नियम आहेत का? – वैभव बावनकर, विद्यार्थी कार्यकर्ता.