कसाबपुऱ्यातील धक्कादायक घटना मित्राचा अपघाती मृत्यू पाहिलेल्या घटनेचा तणाव असह्य़ झालेल्या एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली. सौरभ यशवंत नागपूरकर (१९) रा. तीन नल चौक, कसाबपुरा असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याच्या एका मित्राचा अपघात होऊन मृत्यू झाला होता. हा अपघात बघितल्यानंतर सौरभ तणावाखाली होता. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत कसाबपुरा येथे घडली. सौरभ हा हिंगणा मार्गावरील प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होता. त्याचे वडील एनसीसीमध्ये अधिकारी असून आई गृहिणी आहे. त्याला एक बहीणही आहे. दोन महिन्यांपूर्वी तो महाविद्यालयातून परत येत असताना त्याच्यासमोर एका मित्राचा अपघात झाला व तो जागीच ठार झाला. त्याचा त्याने धसका घेतला. तेव्हापासून तो तणावात होता. रस्त्यांवरून वाहन चालवण्यासही तो घाबरत होता. दरम्यानच्या काळात त्याचाही दोनदा अपघात झाला. रविवारी त्यांच्या नातेवाईकाकडे कार्यक्रम होता. त्यामुळे त्याचे आईवडील घराबाहेर गेले होते. यावेळी घरी बहीण होती. सौरभ हा पहिल्या मजल्यावरील स्वत:च्या खोलीत अभ्यास करीत होता. त्याने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री १० च्या सुमारास आईवडील घरी परतले. त्यांनी मुलीकडे सौरभ संदर्भात विचारणा केली. त्यावेळी तिने आपल्या खोलीत असल्याचे सांगितले. वडील त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावत असताना त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यांनी खिडकीतून डोकावून बघितले असता तो गळफास घेतलेला दिसला. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. मृलाचा मृतदेह बघून त्यांनी हंबरडा फोडला. घरातून रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर शेजारीही गोळा झाले. त्याला खाली उतरवून मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याची माहिती तहसील पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर उपनिरीक्षक अजय ढाकुलकर हे घटनास्थळी पोहोचले. मित्राचा आत्मा बोलावतोय यावेळी सौरभच्या पॅन्टच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यात त्याने आपण तणावाखाली असून मित्राचा आत्मा आपल्याला बोलावत असून आपण त्याला भेटण्यासाठी जात असल्याचे नमूद केले आहे. या शब्दाने सर्वाना धक्का बसला. गेल्या काही दिवसांपासून तो घाबरत घाबरतच महाविद्यालयात जात होता. नेहमी तो आपल्या खोलीत एकटा झोपायचा. मात्र, दोन दिवसांपासून तो आईसोबत झोपण्याचा आग्रह धरत होता.