13 December 2018

News Flash

विद्यापीठाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांच्या नोकरीवर गदा

विद्यार्थ्यांचे निकाल वेळेवर न लागल्याने त्यांना किंमत मोजावी लागली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

निकाल न लागल्याचा फटका, विद्यार्थ्यांचा आरोप

एकीकडे नोकऱ्या मिळत नाही दुसरीकडे  मिळालेल्या नोकऱ्या विद्यापीठाच्या हलगर्जीपणामुळे गमवाव्या लागतात, असा बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

विद्यापीठाने वेळेत पॅनल निश्चित न केल्याने विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षांना उशीर होऊन वेळेत निकाल न लागल्याने नोकरी गमवावी लागल्याचा आरोप वर्धेच्या अग्निहोत्री फार्मसी महाविद्यालयाने केला आहे. महाविद्यालयातील अमित साळवे, अमोल हरणे, कामिनी अवथळे, प्रियंका धोंगडे आणि पूजा आठवले अशा पाच विद्यार्थ्यांचे निकाल वेळेवर न लागल्याने त्यांना किंमत मोजावी लागली. हे सर्व विद्यार्थी एम.फार्म.चा निकाल जाहीर झाल्यानंतर पदवी अभ्यासक्रमांना (बी.फार्म.) शिकवू शकतात. अमित साळवे आणि अमोल हरणे या विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात नोकऱ्या लागल्या. ते कल चाचणीही (अ‍ॅप्टीटय़ुड टेस्ट) उत्तीर्ण झाले. त्यांची तोंडी परीक्षा सहा महिन्यांपूर्वी व्हायला हवी होती. ती विद्यापीठाच्या विधिसभेत प्रश्न लागल्यानंतर परवा ११ मार्चला झाली आणि आता निकाल जाहीर होईलच. मात्र, त्यांच्या हातून नोकरी गेली. कामिनी अवथळे या विद्यार्थिनीची तोंडी परीक्षा झाली. अद्याप निकाल लागायचा आहे. तिला अग्निहोत्री फार्मसी महाविद्यालयातच पदवी अभ्यासक्रमासाठी रूजू करणार होते. मात्र, त्यासाठी एम.फार्म. उत्तीर्ण होणे आवश्यक होते. आता ती पदविका अभ्यासक्रमाला (डी.फार्म.) शिकवत आहे. तिला चांगला आर्थिक फटका बसला. प्रियंका धोंगडे हिला चंद्रपुरातील हायटेक महाविद्यालयात बी.फार्म.ला शिकवण्यासाठी नोकरी लागली होती. मात्र, तिची तोंडी परीक्षाच न झाल्याने तिलाही चांगली नोकरी गमवावी लागली. पूजा आधीच पदविका अभ्यासक्रमाला शिकवत होती. एम.फार्म.चा निकाल विद्यापीठाने जाहीर केला असता तर तिला त्याच महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रम शिकवण्यासाठी घेणार होते, असे महाविद्यालयाच्यावतीने सांगण्यात आले.

महाविद्यालयामुळेच निकालास उशीर

लघुशोधनिबंधावरील तोंडी परीक्षा पूर्ण होऊन महाविद्यालयाने गुण पाठवल्याबरोबर त्या महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांचे निकाल नियमित विद्यार्थ्यांबरोबरच घोषित करण्यात आले. मात्र, ज्यांच्या तोंडी परीक्षा झाल्याच नाहीत, महाविद्यालयांनी उशिरा तोंडी परीक्षा घेऊन उशिरा गुण पाठवले, अशा विद्यार्थ्यांची प्रकरणे शिस्तपालन कृती समितीकडे देण्यात आली. अशा पाच-सहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा १५ मार्चपर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे. त्यांनी त्या पूर्ण करून द्याव्यात. त्यामुळे विलंबाने विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होण्यास महाविद्यालयच जबाबदार असून विद्यापीठाचा काहीही दोष नाही.

      – डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरू, नागपूर विद्यापीठ

विद्यार्थ्यांनी लघुशोधप्रबंध जमा केल्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांचा निकाल जाहीर व्हायला हवा पण, तो झाला नाही.  साधारणत: विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर कंपनीकडून सप्टेंबपर्यंत वाट पाहिली जाते पण, निकाल वेळेत जाहीर न झाल्यास मुलांना नोकऱ्या गमवाव्या लागतात. एखाद्या तज्ज्ञाने ३१ जुलैच्या आधी तारीख देऊनही काही कारणास्तव त्याला पुढे ढकलावी लागली तर हा किती मोठा अपराध असावा? तज्ज्ञाने २ ऑगस्टला तोंडी परीक्षा घेतली म्हणून विद्यार्थ्यांना वेठीस धरून त्यांचे नुकसान करणार का? त्यापेक्षा महाविद्यालयाला दंड करून निकाल त्वरित लावता आले असते. मुळात २००७ पासून आमच्याकडे एम.फार्म. आल्यापासून हा त्रास सुरू झाला आहे

      – डॉ. धर्मेद्र मुंधडा, प्राचार्य, अग्निहोत्री फार्मसी महाविद्यालय

First Published on March 14, 2018 4:49 am

Web Title: students lose job due to nagpur university default