देवेश गोंडाणे

ग्रामीण भागातील नागरिक पावसाळ्यात शेतकामात व्यस्त असतात. त्यांच्या मुलांना शाळेतून मिळणारे पोषण आहार हेच त्यांचे दुपारचे खाद्यान्न असते. त्यामुळे पावसाळ्यात शाळा सुरू न झाल्यास या विद्यार्थ्यांच्या भोजनाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन राज्यभरातील केंद्रप्रमुखांनी शालेय शिक्षण मंत्र्यांकडे साकडे घातले आहे. यावर शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनीही योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

महाराष्ट्राचा बहुतांश भाग हा ग्रामीण आहे. शेती व शेतमजुरी हा प्रमुख व्यवसाय आहे. जून महिन्यात पावसाळ्याची चाहूल लागताच शेतीच्या कामांना सुरुवात होते. बहुतांश पालक सकाळी शेतावर गेले की सायंकाळीच घरी परततात. त्यांची आर्थिक स्थितीही हलाखीची असल्याने ते मुलांना आग्रहपूर्वक माध्यान्ह भोजनासाठी शाळेत पाठवतात.

दरम्यान,  जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन या प्रश्नाबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी सांगितले.

स्थिती काय?

राज्यामध्ये ६६ हजार ७५० शासकीय शाळांमधून ५० लाख ५४ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील ४० टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. हे विद्यार्थी शाळेतील माध्यान्ह भोजनावर अवलंबून.