महाराष्ट्रासह तीन राज्यातील वाघांच्या कृत्रिम स्थानांतरणाचे प्रयत्न अपयशी ठरल्याची उदाहरणे असताना राज्याचे वनखाते एक-दोन नाही तर ५० वाघांच्या कृत्रिम स्थानांतरणावर अडून बसले आहे. हे स्थानांतरण कसे करता येईल, यासाठी अभ्यासगट देखील स्थापन करण्यात आला आहे. वन्यजीव अभ्यासकांच्या विरोधानंतरही वनखात्याने हे पाऊल उचलल्याने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.

चंद्रपूर जिल्ह्य़ातील वाघांचे सुयोग्य अधिवासात संवर्धन व स्थानांतरणाबाबत विविध पर्याय तपासणे व उपाययोजना सुचवणे याकरिता या अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. या जिल्ह्य़ात वाघांची संख्या वाढत असल्याने मानव व वन्यजीव संघर्षांत वाढ होत आहे. मे महिन्यात वनमंत्री संजय राठोड यांनी वाघांच्या कृत्रिम स्थानांतरणाची घोषणा के ली होती. वाघांचे स्थानांतरण हा संघर्ष कमी करण्यासाठी पर्याय होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया वन्यजीव अभ्यासकांनी त्यावर व्यक्त केली होती. राजस्थानमधील सारिस्का तसेच मध्यप्रदेशात हे प्रयत्न अपयशी ठरले होते. महाराष्ट्रातही संघर्षांच्या घटनेतील वाघांचे इतरत्र स्थानांतरण करण्यात वनखाते अपयशी ठरले. मध्यप्रदेशातही वाघांची संख्या अधिक आहे, पण तेथील व्यवस्थापन मजबूत असल्याने त्याठिकाणी चंद्रपूरसारखी संघर्षांची परिस्थिती उद्भवत नाही. संघर्ष टाळण्यासाठी वाघांचे कृत्रिम स्थानांतरण करण्यापेक्षा व्यवस्थापन मजबूत करण्याची गरजही वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. मात्र, त्यानंतरही सात ऑगस्टला झालेल्या वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर आता मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे. हा अभ्यास गट ३१ डिसेंबर २०२० पर्यंत आपला अहवाल शासनास सादर करेल.

चंद्रपुर जिल्ह्यतील मानव-वन्यजीव संघर्षांच्या घटना समजून घेणे आणि त्याचे विश्लेषण करणे, मानव-वन्यजीव संघर्षांबाबत स्थानिकांची मते जाणून घेणे, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी यापूर्वी करण्यात आलेल्या कार्यवाहीचे विश्लेषण करणे, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवणे याबाबत अभ्यास गट काम करणार आहे. हा अभ्यासगट ३१ डिसेंबपर्यंत अहवाल सादर करेल, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

अभ्यासगटात यांचा समावेश

मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण यांच्या अध्यक्षतेखाली गठित अभ्यासगटात सदस्य सचिव म्हणून गोंदिया वनविभागाचे उपवनसंरक्षक कु लराजसिंग व सदस्य म्हणून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. बिलाल हबीब, सेवानिवृत्त उपवनसंरक्षक संजय ठाकरे, सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी गिरीश वशिष्ठ, वनसंवर्धक अभ्यासक डॉ. विद्या अत्रेय, वन्यजीव संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिश अंधेरिया, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अभ्यासक संजय करकरे, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य बंडू धोत्रे, श्रमिक एल्गारच्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी आहेत.