25 September 2020

News Flash

उपराजधानीची ‘क्राईम कॅपिटल’ ही ओळख पुसून काढणार

सततच्या गुन्हेगारी घटनांममुळे उपराजधानीची राज्यभरात ‘क्राईम कॅपिटल’ अशी ओळख निर्माण झाली आहे.

 

गृहमंत्री अनिल देशमुख यांची ग्वाही; लोकसत्ता कार्यालयाला सादिच्छा भेट

नागपूर : सततच्या गुन्हेगारी घटनांममुळे उपराजधानीची राज्यभरात ‘क्राईम कॅपिटल’ अशी ओळख निर्माण झाली आहे. राज्यात कुठेही गेल्यास  याबाबत प्रश्न विचारले जातात.  ही ओळख पुसून काढण्याचे सर्वात मोठे आव्हान मी स्वीकारले असून त्यादृष्टीने  प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अनिल देशमुख यांनी  शुक्रवारी  त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संपादकीय विभागातील सहकाऱ्यांसोबत विविध विषयांवर दिलखुलास चर्चा केली. यादरम्यान त्यांनी नागपूरची ‘क्राईम कॅपिटल’ ही ओळख पुसून काढणार अशी ग्वाही दिली. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालनुसार   सर्वाधिक गुन्हे घडण्याच्या क्रमावारीत  नागपूरचा ११ वा क्रमांक आहे. राज्यात सर्वाधिक गुन्ह्य़ांची नोंद मुंबईत आहे. पण, लोकसंख्येमागे गुन्ह्य़ांचे प्रमाण लक्षात घेता औरंगाबाद प्रथम क्रमांकावर असून अमरावती दुसऱ्या आणि नागपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या सरकारमध्ये गृहखाते  तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  होते. त्यामुळे सरकार चालवताना ते गृह विभागाकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नव्हते. पण, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्यावर पूर्ण विश्वास दाखवून गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे नागपूरवरचा क्राईम कॅपिटलचा शिक्का पुसून राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. गृह विभागातील अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेण्यात येत असून गृह विभागात आवश्यक त्या सुधारणा करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येत आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.

‘होम ड्रॉप’ राज्यभरात राबवणार

महानगरांमध्ये रात्री उशिरापर्यंत महिला कामानिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर नागपूर पोलिसांनी ‘होम ड्रॉप’ ही योजना सुरू केली असून त्या अंतर्गत रात्री ९ ते पहाटे ५ वाजेदरम्यान घराबाहेर असलेल्या महिलांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्यात येते. या योजनेला महिलांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून या योजनेकरिता अधिक मनुष्यबळ देण्यात येणार आहे. उपराजधानीच्या पोलिसांनी सुरू केलेला हा उपक्रम राज्यातील इतर उपनगरीय शहरांमध्ये सुरू करण्यात येईल, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

क्षुल्लक कारणांवरून खुनाचे प्रमाण अधिक  उपराजधानीत क्षुल्लक कारणांवरून खुनाच्या घटना घडत आहेत.  शिवाय देशात नागपूर मध्यवर्ती असल्याने शेजारच्या राज्यामधूनही मजुरीसाठी येणाऱ्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे खून, खुनाचा  प्रयत्न, दरोडा, बलात्कार, जबरी चोरी आदी स्वरूपाचे गुन्हे कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याकरिता गेल्या पाच ते दहा  वर्षांमध्ये विविध गंभीर गुन्ह्य़ात सहभागी असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त व ग्रामीण पोलिसांना देण्यात आले आहेत. गेल्यावर्षी ७० गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करून तुरुंगात डांबण्यात आले.  ३३ कुख्यात गुंडांवर एमपीडीएची कारवाई करून शहर पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या, याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले.

बाल गुन्हेगारांना  मुख्य प्रवाहात आणणार

बालवयात अजाणतेपणातून गुन्हे घडल्यानंतर मुले वाममार्गाला लागतात व मोठे गुंड होतात. त्यामुळे बाल वयात गुन्हा घडल्यानंतर त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. बाल गुन्हेगारांचे समुपदेशन करण्यात येईल. पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांसोबत त्यांची नियमित भेट व्हावी, पोलिसांसोबत वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा घेऊन त्यांच्यातील भीती दूर करण्यात येईल. हा उपक्रम राज्यभरात राबवण्यात येईल, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 1:06 am

Web Title: sub capital nagpur crime capital state home minister anil deshmukh akp 94
Next Stories
1 विमानतळ विकासाच्या कामात आकडय़ांचा खेळ!
2 भौतिकशास्त्राचा प्रबंध मराठीच्या परीक्षकाकडे
3 विधि क्षेत्राशी विद्यापीठाचे जुनेच ऋणानुबंध
Just Now!
X