नवीन ऑटोरिक्षाचा परवान्यासाठीच्या मौखिक परीक्षेत १३७ उमेदवारांचे मराठीचे ज्ञान अल्प; ध्वनिचित्रफितीही तयार

मराठीच्या समजणे आणि बोलता येण्याच्या मुद्दय़ावरून विविध राजकीय पक्ष राजकारण करीत असले तरी महाराष्ट्रात राहणारे अमराठीही उत्कृष्ठ मराठी भाषा बोलू शकतात, हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. त्याचीच प्रचिती ऑटोचालकांसाठी घेण्यात आलेल्या मराठी ज्ञान परीक्षेच्या निमित्तने नागपुरात आली आहे. या परीक्षेत ८५ टक्के मुस्लिम ऑटोचालक उत्तीर्ण झाले आहे.

राज्यात अनेक शहरांत सोडत पद्धतीने ऑटोरिक्षा परवान्याचे फेरवाटप करण्यास सुरवात झाली आहे. ऑटोचालकांना अंतिम इरादापत्र देण्यापूर्वी मराठी भाषेच्या ज्ञानाची मौखिक चाचणी घ्यावी, असर्ा ुआदेश परिवहन आयुक्तांनी काढला. महाराष्ट्रात मराठी राजभाषा आहे. या भाषेचे ज्ञान येथे राहणाऱ्या प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. या हेतूने ज्या ऑटोचालकांना मराठी येत असेल त्यांनाच परवाना दिला जावा, असा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. हा निर्णय मराठी भाषिक वगळता अन्य भाषिकांना न पचणारा आणि न पटणारा आहे. परंतु, मराठी भाषेविषयीचे  प्रेम सांगणारा परिवहन विभागाचा निर्णय चुकीचाही नाही परंतु, यावर अनेक अमराठी भाषिकांनी नाराजी व्यक्त केली.

नागपूर शहरात १ हजार, ९८३ उमेदवारांना परीक्षेकरिता वेळ देण्यात आली होती. त्यानुसार १ हजार ७,३७ उमेदवार परीक्षेकरिता पोहोचले. त्यातील १३७ उमेदवारांना मराठीचे योग्य ज्ञान नसल्याचे पुढे आले. त्यांचे प्रकरण प्रलंबित ठेवून इतर सगळ्यांना इरादापत्र देण्यात आली. या उत्तीर्ण उमेदवारांकडून शासनाला तब्बल १ कोटी ४५ लाख ३१ हजार रुपयांचे शुल्क मिळाले. २२९ उमेदवार परीक्षेला अनुपस्थित राहिल्याने त्यांना परवान्याच्या प्रक्रियेतून बाद करण्यात आले. नापास झालेल्यांसह अनुपस्थित असलेल्यांमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आहे. नागपुरात ऑटोरिक्षाच्या परवानाकरिता भालदारपुरा, मोमीनपूरा, हसनबाग, ताजबाग, कुंभारटोली, टेकानाका अशा विविध भागात मुस्लिम बांधवांनी मराठी ज्ञानाची परीक्षा पास केली.राज्यात ४२ हजार ७९२ ऑटोरिक्षा परवान्यांचे लॉटरी पद्धतीने फेरवाटप १२ जानेवारी २०१६ रोजी करण्यात आले. नागपुरात दोन हजारांवर परवाने देण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑटोरिक्षा चालकांच्या मराठी भाषेचे ज्ञान तपासून घेण्यासाठी पत्रकारांची नियुक्ती केली. व्हिडिओ रेकॉर्डिगही करण्यात येत आहे. नागपूर आरटीओ कार्यालयात चाचणीसाठी दोन पथके तयार केली होती. या परीक्षेत मुस्लिम बांधवांची संख्या ६० टक्के होती. अमराठी भाषिकांना मराठी समजत होते. काही मुस्लिम बांधव मराठीतून संवाद साधत होते. उपप्रादेशकि परिवहन अधिकारी विजय चव्हाण व रवींद्र भुयार, सहाय्यक परिवहन अधिकारी सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षा झाल्या.