अवयवदानाने सहा जणांना जीवनदान; उपराजधानीत सहावे यकृत प्रत्यारोपण यशस्वी

शेतीच्या काळ्या मातीत परिश्रमाचे बीज रोवून जगाचे पोट भरणाऱ्या एका शेतकऱ्याने हे जग सोडतानाही सहा जणांना जीवनदान दिले. या मृत शेतकऱ्याच्या अवयवदानातून हृदय, यकृत, दोन मूत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण झाले. बुब्बुळ माधव नेत्रपेढीला देण्यात आले.  या बुब्बुळांच्या प्रत्यारोपणातूनही दोन अंधांच्या आयुष्यात प्रकाशपहाट उगवणार आहे.

सुरेश बलराम डुकरे (३५) रा. वणी, जि. यवतमाळ असे मेंदूमृत रुग्णाचे नाव आहे. त्याला पत्नीसह तीन आणि पाच वर्षे वयाच्या दोन मुली असून या कुटुंबाची उपजीविका शेतीवरच आहे. सुरेशचा काही दिवसांपूर्वी यवतमाळमध्ये अपघात झाला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला अत्यवस्थ अवस्थेत प्रथम यवतमाळ व तेथून उपराजधानीतील लकडगंज येथील न्यू ईरा या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा मेंदू मृत झाल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला देण्यात आली. रुग्णालयासह विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी आणि डॉ. रवि वानखेडे यांनी मृताच्या कुटुंबाला अवयवदानाचे महत्त्व सांगितले. नातेवाईकांनीही होकार दिला. त्यानंतर या रुग्णाचे गुणसूत्र जुळणाऱ्या रुग्णांची शोधाशोध सुरू झाली. शेवटी  नागपूर जिल्ह्य़ात यकृताचा, चेन्नईच्या फॉरटीस रुग्णालयात हृदयाचा, वोक्हार्ट आणि ऑरेंज सिटी रुग्णालयात मूत्रपिंडाचा रुग्ण आढळला. विभागीय अवयव  प्रत्यारोपण समितीने होकार दर्शवताच सर्व रुग्णालयांतील वैद्यकीय पथक अवयव घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. या सर्व प्रवासात डॉ. आनंद संचेती, डॉ. नीलेश अग्रवाल, डॉ. राहुल सक्सेना, डॉ. संजय कोलते यांच्यासह विविध रुग्णालयांतील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका वठवली.

विशेष विमानाने हृदय गेले चेन्नईला

ग्रीन कॅरिडोरने अवयव वेगवेगळ्या रुग्णालयांत पाठवून संबंधित रुग्णांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. चेन्नईला विशेष विमानाने हृदय  हलवण्यात आले. नीलेश पटेल या ३४ वर्षीय कळमेश्वरच्या रुग्णाच्या शरीरात न्यू ईरा रुग्णालयातच यकृत प्रत्यारोपण झाले. या रुग्णालयात हे पाचवे यशस्वी प्रत्यारोपण असून एक प्रत्यारोपण वोक्हार्ट या रुग्णालयातही झाले आहे. या रुग्णाचे दोन बुब्बुळ माधव नेत्रपिढीला दिले गेले असून त्याचेही लवकरच प्रत्यारोपण होईल.