News Flash

एक शतक जुन्या ऊस बाजाराला स्थायी जागा मिळेना!

उन्हाची काहिली भागवण्यासाठी ऊसाच्या रसाशिवाय इतर चांगले पेय नाही.

sugarcane
प्रतिनिधिक छायाचित्र

रस्त्यावर विक्री, वाहतुकीचा खोळंबा

उन्हाची काहिली भागवण्यासाठी ऊसाच्या रसाशिवाय इतर चांगले पेय नाही. त्यामुळे उन्हाळ्यात तीन ते चार महिने शहरातील गल्लीबोळात रसविक्रेते दिसून येतात. उपराजधानीतल्या जुन्या एम्प्रेस मिलजवळ आणि आताच्या एम्प्रेस सिटी मॉलजवळ भरणाऱ्या ऊस बाजाराला १०० वर्षांचा इतिहास आहे, पण अजूनही हा बाजार रस्त्यावरच भरतो. गेल्या काही वर्षांत या व्यापाऱ्यांना अतिक्रमणाच्या कारवाईला सामोरे जावे लागत असून स्थायी जागा देण्याची मागणी या व्यापाऱ्यांकडून होत आहे.

विदर्भातील सर्वात मोठा उसाचा बाजार म्हणून याकडे पाहिले जाते. शहराजवळील सावनेरपासून तर वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, परतवाडा, दारव्हा यासह औरंगाबाद, नाशिक आदी ठिकाणाहून येथे व्यापारी येतात. उपराजधानीत मागणी वाढल्याने येथे ऊस व्यापाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोटय़वधी रुपयाची उलाढाल बाजारातून होते. हा सर्व व्यवहार  रोख स्वरूपात होतो. सुरक्षा आणि सुविधेची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे चोरटय़ांची भीती असते. त्यामुळेच गेल्या २० वर्षांपासून शहरातील संत्रा बाजाराप्रमाणेच ऊस व्यापारासाठी देखील स्थायी व्यवस्था करून देण्याची मागणी आहे. बाजाराच्या दिवशी याठिकाणी सुमारे ४० ते ५० ट्रक माल येतो. दररोज या ठिकाणाहून किमान पाच ट्रक उसाची विक्री होते. आठवडय़ातून चार दिवस याठिकाणी बाजार भरतो.  हा सर्व व्यवहार रस्त्यावरच होत असल्याने वाहतूक विस्कळीत होते. अशावेळी अतिक्रमण विभागाकडून त्याच्यावर कारवाई केली जाते. अलीकडेच याठिकाणी झालेल्या कारवाईत सुमारे दोन ट्रक माल जप्त करण्यात आला. त्यामुळे स्थायी जागा देण्याची मागणी वामन देवतळे, तेजराम ढेंगे, हमीद मिजार, लक्ष्मण दांडेकर आदींनी केली आहे.

दिवसाला केवळ ४०० ते ५०० रुपयांची कमाई

शेतकऱ्यांकडून दलाल ऊस रोखीने खरेदी करतात. त्यांच्याकडून रस विक्रेते ऊस खरेदी करतात. त्यातही हिरवा आणि कथ्थ्या रंगाचा असे दोन प्रकारचे ऊस येतात. हिरव्या रंगाच्या उसातून पांढरा आणि कथ्थ्या रंगाच्या (कटंगी) उसातून गर्द रंगाचा रस बाहेर येतो. कटंगी प्रजातीचा ऊस अधिक महाग आहे. एका गठ्ठय़ात सुमारे २५ ते ३० ऊस असतात. दहा गठ्ठय़ांसाठी आठ हजार रुपये मोजावे लागतात. दिवसभर उन्हात राहून रस विक्रेत्यांची दिवसाला केवळ ४०० ते ५०० रुपयांची कमाई होते. दहा रुपयांपासून तर पंचवीस रुपये ग्लासपर्यंत उसाचा रस विकला जातो. एक गठ्ठा तीन दिवस चालतो. एका उसातून दोन ग्लास ऊस निघतो. शहरात जवळजवळ दोन हजाराच्या आसपास रसविक्रेत्यांची संख्या असून एक लाख लीटर उसाचा रस रोज तयार होतो व उन्हाची काहिली सहन करणाऱ्यांची तृष्णा भागवतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2018 12:30 am

Web Title: sugarcane crisis in nagpur
Next Stories
1 नक्षलवादी समर्थक असल्याच्या संशयावरून राज्यभरात छापे
2 मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावातील शेतकऱ्याची आत्महत्या की अपघाती मृत्यू?
3 मुहूर्तावर सोने खरेदी महागात 
Just Now!
X