आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुक्काम

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर अखेर मंगळवारी गोरेवाडा बचाव केंद्रातील ‘सुलतान’ वाघाला, बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात स्थानांतरित करण्याकरता नेण्यात आले. यासाठी मंगळवारी सकाळी राष्ट्रीय उद्यानाचा चमू गोरेवाडय़ात दाखल झाला होता.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात चार वाघिणी आणि एक वाघ आहे. यातील एका वाघिणीचे वय उलटून गेले असून उर्वरित तीन वाघिणींसाठी जोडीदाराची आवश्यकता आहे. उद्यानातील वाघांच्या प्रजोत्पादनासाठी गोरेवाडा बचाव केंद्रातील वाघाची मागणी झाली. या मागणीनंतर भंडारा जिल्ह्यतील तुमसर तालुक्यातून आणलेल्या ‘राजकुमार’ या वाघाला पाठवण्याचे निश्चित झाले होते. मात्र, ऐनवेळी चंद्रपूर जिल्ह्यतील ब्रम्हपुरी वनक्षेत्रातून आणलेल्या ‘सुलतान’ला पाठवण्याची तयारी गोरेवाडा प्रशासनाने दाखवली. तुमसर तालुक्यातील एका गावात चक्क लग्नमंडपात ‘राजकुमार’ने प्रवेश केला होता. त्याची ही कृती अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली होती तर ‘सुलतान’ने दोन गावकऱ्यांचा बळी घेतला होता. त्यामुळे कोणता वाघ पाठवायचा यावरून राष्ट्रीय उद्यान प्रशासन व गोरेवाडा प्रशासनात मतभेद देखील झाले. स्थलांतरणाचा हा सर्व घाट घातला गेला, पण प्राधिकरणाच्या परवानगीचा विसर या दोन्ही प्रशासनाला पडला होता. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने १२ नोव्हेंबरला दिलेल्या मंजुरीनंतर डिसेंबरमध्ये ‘सुलतान’ला नेण्याचे ठरले. त्यानुसार  राष्ट्रीय उद्यानातील अधिकारी विजय बारब्दे आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांचा चमू  नागपुरात पोहोचला व कागदपत्रांची देवाणघेवाण झाली. त्यानंतर गोरेवाडय़ातील वन्यप्राणी संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. एस.व्ही. उपाध्ये, उपसंचालक डॉ. विनोद धूत, डॉ. सुजीत कोलगंथ, डॉ. मयूर पावशे, डॉ. शालिनी ए. एस. यांनी वाघाची आरोग्य तपासणी केली. तो सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर त्याला पिंजऱ्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अवघ्या अर्ध्या तासांत  वाघ पिंजऱ्यात आला. त्यानंतर दुपारी तीन वाजता राष्ट्रीय उद्यानाचा  चमू ‘सुलतान’ला घेऊन मुंबईकडे रवाना झाला.

गोरेवाडा प्रशासनाला प्रसारमाध्यमांचे वावडे

गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील बचाव केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी गोरेवाडा प्रशासनाने सफारीच्या उद्घाटनासाठी प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारला. वनखात्याचे तत्कालीन प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांना ही बाब लक्षात आली. प्रशासनाच्या कार्यात पारदर्शकता राहावी म्हणून त्यांनी  स्वत: पत्रकारांसाठी एका वाहनाची व्यवस्था केली. मात्र, गोरेवाडा प्रशासन ही बाब विसरले आणि ‘अवनी’ या वाघिणीच्या शवविच्छेदनापासून तर आता ‘सुलतान’च्या मुंबईला रवाना होण्यापर्यंत  त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रवेशद्वाराबाहेरच रोखले. ‘सुलतान’च्या रवानगीचे छायाचित्र काढण्यासाठी छायाचित्रकार गेले असता ‘आमच्याकडे राष्ट्रीय दर्जाचे छायाचित्रकार आहेत’असे  उत्तर देत प्रशासनाने  त्यांना प्रवेश नाकारला. त्यामुळे गोरेवाडय़ात काही काळेबेरे तर  नाही ना, असाही संशय आता व्यक्त केला जात आहे.