मोकाच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेला आणि एका प्राध्यापकावर दहशत निर्माण करणाचा आरोप असलेल्या भाजयुमोचा निलंबित पदाधिकारी सुमीत ठाकूर याला पोलीसांनी शुक्रवारी अमरावतीमधील धामणगाव रेल्वे येथून अटक केली. त्याच्यासोबत मनोज शिंदे आणि अतुल शिरभाते या दोघांनाही अटक करण्यात आली असल्याचे पोलीसांनी सांगितले. या सर्वांना नागपूरमधील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी सुमीत ठाकूर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी प्रा. मल्हारी म्हस्के यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीला धडक दिली होती आणि त्याच्यांकडूनच नुकसान भरपाईची मागणी केली होती. यानंतर त्यांनी म्हस्के यांना धमक्याही दिल्या. म्हस्के यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. भाजयुमोच्या पदाधिकाऱ्याकडूनच सामान्यांना धमक्या येत असल्यामुळे राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी याप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. या घटनेनंतर सुमीत ठाकूर फरार झाला होता. पोलीस अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेत होते.
दरम्यान, सुमीत ठाकूर याच्या दहशतीला कंटाळून प्रा. मल्हारी म्हस्के यांनी नागपूर सोडण्याचा निर्णय घेतला. मोका लागलेल्या व पोलिसांना वॉन्टेड असलेल्या आरोपीच्या धमकीमुळे म्हस्के यांना नागपूर शहर सोडण्याची वेळ येत असेल तर सर्वसामान्य जनतेची काय अवस्था असेल, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उपस्थित केला होता.