प्रा. मल्हारी मस्के यांना जातीवाचक शिविगाळ करणे, धमकी देणे आणि कार जाळण्याच्या प्रकरणात ‘भाजयुमो’चा माजी शहर उपाध्यक्ष कुख्यात गुंड सुमीत राजकुमार ठाकूर (३०) याच्या मुसक्या आवळण्यात नागपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांना अखेर यश आले असून त्याला धामनगाव रेल्वे येथे काल गुरुवारी रात्री ४.३० च्या सुमारस अटक करण्यात आली.
एलएडी महाविद्यालयाचे प्रा. मल्हारी मस्के हे गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रेरणानगर परिसरात राहतात. त्यांच्या घराच्या मागच्या रांगेत सुमीत ठाकूर आणि त्याचे कुटुंबीय राहतात. गेल्या २० सप्टेंबर रोजी त्याने प्रा. मल्हारी मस्के यांच्या गाडीला धडक दिली. नेहमीप्रमाणे यावेळीही त्याने प्रा. मस्के यांना दमदाटी केली. गाडीच्या नुकसानीसाठी मस्केंकडून तो पैसे मागू लागला. परंतु प्रा. मस्के यांनी त्याच्या मुजोरीला न जुमानता पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिस प्रशासनही सुमीतच्या बाजूने होते. प्रा. मस्के हे पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्याचे समजतात सुमीत, त्याचा भाऊ अमित, वडील राजकुमार ठाकूर आणि वस्तीतील इतर गुडांनी मिळून त्यांना जातीवाचक शिविगाळ करून मारण्याची धमकी दिली. त्यानंतरही प्रा. मस्के हे आपल्या निर्णयावर ठाम असल्याने गिट्टीखदान पोलिसांनी नाईलाजास्तव सुमीतविरुद्ध तक्रार नोंदवून घेतली आणि प्रा. मस्के यांच्या सुरक्षेसाठी दोन पोलिस नेमले. दोन पोलिस सुरक्षारक्षक असतानाही सुमीत ठाकूर याने २५ सप्टेंबर रोजी आपल्या साथीदारांसह प्रा. मस्के यांच्या घरासमोरील त्यांची कार फोडून जाळली. सदर प्रकरण प्रसारमाध्यमांनी लावून धरल्याने सरकार आणि पोलिसांवर दबाव वाढल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई केली. राजकुमार ठाकूर याला अटक झाल्यानंतरही सुमीत, अमित आणि त्याचे साथीदार फरार झाले. त्यानंतर नागपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या साथीदारांची धरपकड सुरू केली. गुरुवारी रात्री पोलिसांना टीप मिळाली की, सुमीत हा वर्धा येथे लपलेला आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील, गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनात एक पथक वर्धेकडे निघाले. त्यांना पुढे समजले की, सुमीत हा मित्राच्या मदतीने धामणगाव येथे लपलेला आहे. पोलिसांनी रात्री ४.३० च्या सुमारास योजना आखली आणि अतुल रूपराव शिरभाते (३४) रा. मिरा छांगानीनगर, स्वामी समर्थ मंदिराजवळ, धामणगाव (रेल्वे) यास ताब्यात घेतले आणि सुमीतचा पत्ता विचारला. त्यावेळी सुमीत हा अतुलच्या शेजारच्या एका घरी झोपलेला होता. पोलिसांच्या सांगण्यानुसार अतुलने दार ठोठावले. त्यानंतर सुमीतने दार उघडले आणि पोलिसांनी त्याला खोलीत ढकलून ताब्यात घेतले. इतक्यात सुमीतचा साथीदार मनोज प्रकाश शिंदे (३०) रा. प्लॉट नं. ४३, पंच कमेटीजवळ, बोरगांव हा एमएच-३१, ईके-१७९७ क्रमांकाच्या कारने पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. परंतु पोलिसांनी त्याला गाडीतच पकडले. यानंतर पोलिस तिघांनाही घेऊन सकाळी नागपुरला आले. आतापर्यंत या प्रकरणात एकूण १२ आरोपींना अटक करण्यात आली, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त श्रीकांत तरवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त दीपाली मासिरकर, सहाय्यक पोलिस आयुक्त निलेश राऊत उपस्थित होते. या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र पवार, गोकुळ सूर्यवंशी, दिनेश दहातोंडे, सचिन लुले, हवालदार राजेश ठाकूर, प्रशांत देशमुख, दयाशंकर बिसांद्रे, मंजित ठाकूर आणि राकेश यादव हे सहभागी होते.

सुमीतच्या पाठराखणीवरून भाजपमध्ये तूतू-मैमै
भाजपच्या स्थानिक पुढाऱ्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लाभ मिळविण्यासाठी सुमीत ठाकूरला भारतीय जनता युवा मोर्चात सामील करून घेऊन उपाध्यक्षपद बहाल केले. त्याच्या पाठीशी स्थानिक आमदार सुधाकर देशमुख असून त्याला भाजयुमोचे उपाध्यक्षपदही त्यांच्याच आग्रहामुळे मिळाले, असा आरोप गिट्टीखदान परिसरातील स्थानिक नेत्यांनी केले. प्रा. मल्हारी मस्के यांनीही लोकसत्ताशी बोलताना सांगितले, सुमीत ठाकूरने आपली कार जाळल्यानंतर महापौर प्रवीण दटके, माजी महापौर माया इवनाते आणि भाजपच्या सर्वच स्थानिक नेत्यांनी भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली. परंतु स्थानिक आमदार देशमुख यांनी भ्रमणध्वनीवरून साधी चौकशीही केली नाही. या संदर्भात देशमुख यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, सुमीत ठाकूरला मी ओळखत नाही. त्याला भाजयुमोत आणण्याचा आग्रह तत्कालीन भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत बोदड यांनी धरला आणि भाजयुमोचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी त्याला उपाध्यक्ष केले. मला ज्यावेळी समजले त्यावेळी मी सुमीतला भाजयुमोत घेऊ नका म्हणून विरोध केला होता.
माझा सुमीतशी काहीही संबंध नसून सर्व निर्णय भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी घेतले. आठ दिवसांपूर्वी बंटी कुकडे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले होते की, आपल्या अनुपस्थितीत सुमीतला भाजयुमोचा उपाध्यक्ष करण्यात आले. त्यासाठी स्थानिक बडय़ा नेत्यांचा पदाधिकाऱ्यांवर दबाव होता. यापैकी कोणता नेता खरे बोलतोय, हे तेच सांगू शकतील.