देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक भारतीय जवान एकटे नाहीत. भविष्यात मोठे युद्ध लढण्याची वेळ आली तरी प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतीय सीमेच्या संरक्षणासाठी काही तासात उभा राहील, या वक्तव्यावर काथ्थ्याकूट करण्यापेक्षा त्यामागील भाव समजून घेण्याची गरज आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकरांनी राष्ट्रप्रेमासाठी हातातून रक्त निघेपर्यंत काथे कुटले हा इतिहास सर्वश्रूत आहे, पण त्यामागची भावना निखळ राष्ट्रभक्तीची होती. मात्र, आज पुन्हा एकदा हा काथ्थ्याकूट बाजूला सारत भाव समजून घेण्याची गरज असल्याचे सांगत लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या विधानाचे समर्थन केले.

विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलात आज द्विदिवसीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी तीन दिवसात संघाचे स्वयंसेवक सीमेवर लढण्यासाठी पाठवता येतील, असे विधान केले होते. त्या विधानावर देशभर टीका झाली असताना सुमित्रा महाजन यांनी सरसंघचालकाचे कुठेही नाव न घेता त्यांचे समर्थन केले. स्वातंत्रवीर सावरकर जाज्ज्वल्य देशाभिमान असणारे क्रांतिवीर होते. त्यांनी आजीवन राष्ट्र आणि राष्ट्रहिताचाच विचार केला. ‘राष्ट्रहित’ हीच त्यांची भाषा होती. सावरकर स्वातंत्र्यानंतर जन्माला आले असते तर ते उत्तम साहित्यिक, कवी झाले असते. त्यांच्या याच विचारसरणीला आत्मसात करून नवीन पिढीने देशाभिमान बाळगावा.

नव्या पिढीने स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महान व्यक्तींचा आदर्श आपल्यासमोर ठेवला तर ते एक चांगले व्यक्ती म्हणून समाजाचे दायित्व निभावू शकतील. सामान्य माणसाने आपली शक्तिस्थान ओळखून देशहिताचे कर्तव्य बजावले तर निश्चितच देशाच्या विकासाला मदत मिळेल. असे सांगत त्यांनी वि. दा. सावरकरांच्या निवडक काव्यरचनांची यावेळी माहिती दिली.

आठवणीने सुमित्रा महाजन भावूक

सावरकरांवर असलेली भक्ती काय असते याचे उदाहरण देताना लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन फार भावूक  झाल्या. सावरकरांवर चित्रपटाची निर्मिती होत असताना संगीतकार सुधीर फडके इंदौरमध्ये आले असता एका कार्यक्रमात चित्रपटासाठी मदतीचे आवाहन केले. त्या कार्यक्रमाला मी होते. कार्यक्रम आटोपल्यावर एक महिला समोर आली आणि तिने सुधीर फडके यांची भेट घेऊन माझ्याजवळ आणि बँकेत फार काही पैसे नसल्याचे सांगत हातातील सोन्याच्या बांगडय़ा त्यांच्या हातात दिल्या आणि ही माझी मदत म्हणून त्या निघून गेल्या. हा मदतीचा भाव म्हणजे सावरकरांविषयी असलेली निष्ठा आहे, असे सांगत त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या रुमालाने डोळे पुसत असताना त्यांनी यावेळी लोकांच्या डोळ्यात पाणी आणले. अटलबिहारी बाजपेयी यांना भेटण्याची हिंमत होत नाही. मात्र, त्यांच्या वाढदिवशी त्यांनी पुण्यात सावरकरांवर केलेले भाषण ऐकले आणि मन भरून आले, असे सांगत असताना त्या भावूक झाल्या आणि काही क्षण थांबत भाषण सुरू केले.