परीक्षा मंडळाच्या बैठकीत कुलगुरूंची माहिती

कोणत्याही विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाला विद्यार्थ्यांची गुणपत्रिका परत घेण्याचा अधिकार नाही. असे असतानाही तत्कालीन परीक्षा मंडळाने सुनील मिश्रा यांच्या  एलएलबीच्या तिन्ही वर्षांच्या गुणपत्रिका परत घेतल्या. हा सर्वच प्रकार संशयास्पद असून सुनील मिश्रा यांनी ज्यावेळी परीक्षा मंडळाला या गुणपत्रिका परत केल्या त्याच वेळी या गुणपत्रिका लोअर कोर्टातही सादर करण्यात आल्या.  याचाच अर्थ सुनील मिश्रा यांनी यात फसवणूक केली असून मिश्रांच्या या गुणवाढ घोटाळ्याविरुद्व पोलिसात तक्रार केली जाईल, अशी माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत  कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे यांनी दिली.

डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या पदवीबाबत वाद निर्माण झाल्यावर डॉ. मिश्रा यांनी पदवी विद्यापीठाला परत करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु विद्यापीठाने अशी पदवी परत घेण्याची तरतूद विद्यापीठात नाही असे सांगत ती पदवी नाकारली होती. त्यावेळी डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी सुनील मिश्रा यांचे उदाहरण दिले होते. सुनील मिश्रा यांच्या गुणपत्रिका परत घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. हाच संदर्भ घेऊन विद्यापीठाने चौकशी केली असता सुनील मिश्रांचा हा गुणवाढ घोटाळा उघड झाला.  २००६ मध्ये सुनील मिश्रा यांनी एलएलबी-१, एलएलबी-२ आणि एलएलबी तिसऱ्या वर्षांची अशा तीन गुणपत्रिका विद्यापीठाला परत करण्याची इच्छा व्यक्त केली आणि १३ नोव्हेंबर २००६च्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत त्यांनी त्या गुणपत्रिका परत केल्या. सोबतच औरंगाबाद विद्यापीठाची ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझमचीही पदवीही परत केली होती. त्यावेळी कोहचाडे गुणवाढ  प्रकरण सत्र न्यायालयात सुरू होते. त्यात सुनील मिश्राही एक आरोपी होते. या प्रकरणातही मिश्रांनी लोअर कोर्टाला गुणपत्रिका सोपवल्या होत्या.

नियमानुसार परीक्षा मंडळाला (बीओई) कुणाचीही गुणपत्रिका परत घेता येत नाही. परीक्षा दिल्यानंतर मिश्रा यांनी गुणांमध्ये फेरफार केल्याने हा विषय तसाही बीओईच्या अंतर्गत येत नाही. अशा परिस्थितीत १३ नोव्हेंबर २००६च्या बीओईचा निर्णय रद्द केल्यास ‘त्या’ तिन्ही गुणपत्रिका जिवंत होतात. त्यामुळे या गंभीर प्रकरणाी विद्यापीठाच्या प्रशासनाने कायदेशीर बाबी योग्यरित्या तपासून  कारवाई करावी, असा निर्णय आजच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

डॉ. सिद्धार्थ काणे, कुलगुरू

या विषयावर कोर्ट-कचेरी सर्व झाले आहे. जेव्हा कोर्टाचा निर्णय होतो तेव्हा त्यावर दुसऱ्यांदा काही करायचे नसते, ही साधी गोष्ट विद्यापीठ प्रशासनाला कळत नाही का? एलएलबी- प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या गुणपत्रिकेच्या संदर्भात सर्व सोपस्कार पार पडले असल्याने याविषयावर आता बोलण्यासारखे काही उरले नाही.

–  सुनील मिश्रा