महेश बोकडे

महापालिका, आरोग्य विभागाच्या आकडय़ात तफावत

स्वाईन फ्लू बाधित रुग्ण आणि यामुळे होणारे मृत्यू याचे प्रमाण राज्यात नागपुरात सर्वाधिक असताना याबाबतच्या अचूक नोंदीबाबत मात्र महापालिका आणि शासनाच्या आरोग्य यंत्रणेने घोळ घातला आहे. स्वाईन फ्लूमुळे  २८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेकडे आहे, तर  सार्वजनिक आरोग्य विभागाकडे ही संख्या २३ आहे. त्यामुळे खरी मृत्यू संख्या किती? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जानेवारी २०१९ पासून राज्यात स्वाईन फ्लूचा विळखा घट्ट होत आहे. गेल्यावर्षी १ जानेवारी ते १७ मार्च २०१८ या अडीच महिन्याच्या तुलनेत यंदा याच काळात मृत्यू बारा पटींनी वाढल्याचे लोकसत्ताने उघड केले होते. नागपूरसह पूर्व विदर्भात मृत्यू संख्या वाढत असल्याने शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थेसह सार्वजनिक आरोग्य विभागातील यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, परंतु नागपूर महापालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने या सूचनांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

१ जानेवारी ते २३ एप्रिल २०१९ या दरम्यान  महापालिकेकडील नोंदीनुसार ३६० रुग्णांना स्वाईन फ्लूची बाधा झाली व उपचारादरम्यान त्यातील २८ जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडे मात्र बाधित रुग्ण संख्या ३३१ नोंदवण्यात आली असून मृत्यू संख्या २३ आहे. यावरून दोन्ही विभागात समन्वय नाही, असे स्पष्ट होते.

नोंदीबाबत लपवाछपवी?

परराज्यातील स्वाईन फ्लू बाधित रुग्णांचा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असेल तर त्याची नोंद न घेण्याची सूचना सार्वजनिक आरोग्य खात्याने विभागाला दिल्याची माहिती आहे. त्याला एका अधिकाऱ्याकडून दुजोराही मिळाला आहे. परराज्यातील रुग्ण आधी आरोग्य विभागाकडे पॉझिटिव्ह नोंदवले गेले असले तरी त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याचे दर्शवण्यात आले.