प्रवाशांचे आरोग्य धोक्यात

धावत्या गाडीत प्रवाशांच्या जेवणाची सुविधा पेन्ट्रीकारच्या (धावत्या गाडीतील स्वयंपाकघर) माध्यमातून दिली जाते. परंतु गेल्यावर्षीपासून पेन्ट्रीकारला पुरवठा होत असलेल्या कच्च्या मालाची गुणवत्ताच तपासण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

आयआरसीटीसीने बहुतांश पेन्ट्रीकार कंत्राटदाराला दिले आहेत. येथे अन्नपदार्थासाठी लागणारे जिन्नस, कच्चा माल पुरवण्याचे काम विविध वेंडरला देण्यात आले आहे. साधारणत: एका वेंडरला चार ते पाच रेल्वेगाडय़ांत साहित्य पुरवण्याची परवानगी दिली जाते. लांब पल्लय़ाच्या गाडय़ांमध्ये प्रवाशांना भोजन, नाश्ता, चहा, कोल्ड्रिंग पुरवण्यासाठी पेन्ट्रीकारची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागपूर मार्गे जाणाऱ्या विविध गाडय़ांत भाजीपाला, अंडे, ब्रेड, तेल, इत्यादी कच्चा माल येथील अधिकृत पाच वेंडरकडून पुरवला जातो. मात्र कच्च्या मालाची गुणवत्ता कधीच तपासली जात नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नागपुरात पाच अधिकृत वेंडर

रेल्वेगाडय़ांना कच्चा माल पुरवण्यासाठी नागपुरात पाच अधिकृत वेंडरची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रेल्वेचा वाणिज्य विभाग परवाना शुल्क घेते. या परवान्याच्या आधारावर ते इतरही गाडय़ांमध्ये कच्चा माल पुरवतात, असे कळते.