नागपुरात करोना महामारीच्या साथीने थैमान घातले असताना या रोगावर परिणामकारक ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयांना दोन दिवसांपासून होत नसल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी, अन्न व औषध विभागाचे अधिकारी फोन घेत नाहीत. त्यामुळे नेमकी स्थिती काय हे स्पष्ट होत नाही.

विशेष म्हणजे, या इंजेक्शनचा काळाबाजार वाढल्याने याचे वाटप जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आपल्या हाती घेतले. त्यांच्या माध्यमातून सरकारी व खासगी रुग्णालयांना तेथील रुग्णसंख्येच्या प्रमाणात वाटप के ले जात होते. त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संके तस्थळावर उपलब्ध  करून दिली जात होती. मागील दोन दिवसांपासून ही व्यवस्था कोलमडली आहे. मागील दोन  दिवसांपासून एकाही रुग्णालयाला  जिल्हाधिकारी कार्यालयामार्फ त इंजेक्शनचे वाटप करण्यात आले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संके तस्थळावर १६ एप्रिलपर्यंतचेच वाटप पत्रक उपलब्ध आहे.  त्यानुसार १६ तारखेला शहरातील ११५ आणि ग्रामीणमधील ३९ अशा एकू ण १५४ रुग्णालयांना ३३२६ इंजेक्शनचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर ते बंद आहे. नागपुरात दिवसाला १५  हजार इंजेक्शनची गरज आहे. प्रत्यक्षात पुरवठा ३  किं वा ४ हजार इंजेक्शनचा होतो.  त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. कं पन्यांकडूूनच पुरवठा होत नसल्याने  आम्ही वाटणार कोठून, असे अधिकारी खासगीत सांगतात, मात्र दुसरीकडे काळ्याबाजारात इंजेक्शन उपलब्ध आहे. ते कोठून  येतात, असे विचारले असता याबाबत कोणीच काही सांगत  नाही.

मुळात जिल्हाधिकाऱ्यांकडून रुग्णालयांना त्यांच्याकडील मंजूर खाटांच्या आधारावर इंजेक्शनचे वाटप के ले जाते. प्रत्यक्षात रुग्णालयात रुग्णांची संख्या अधिक असल्याने पुरवठा कमी पडतो. आधीच तुटवडा त्यात दोन दिवसांपासून पुरवठाही बंद झाल्याने सर्व रुग्णालयात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.  यासंदर्भात सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याशी संपर्क  साधला असता ते पालकमंत्री नितीन राऊत यांच्या बैठकीत  व्यस्त असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. रेमडेसिविर वाटप समितीचे समन्वयक अधिकारी शेखर गाडगे यांच्याशी संपर्क  साधला असता त्यांचा दूरध्वनी बंद होता.

आज तीन हजार इंजेक्शन येणार

१७ एप्रिलपासून रेमडेसिविरचे वाटप रुग्णालयांना बंद आहेत. भारतात मोजक्याच कं पन्या या इंजेक्शनचा पुरवठा करतात, महाराष्ट्रात एकही कं पनी नाही. त्यामुळे तुटवडा जाणवत आहे. मात्र आज ३ हजार इंजेक्शनचा पुरवठा होईल व त्याचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या व्यवस्थेनुसार के ले जाईल, असे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.