राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे धडाडीचे नेते विलासराव देशमुख यांच्या अकाली निधनामुळे काँग्रेसमधील त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी त्यांचेच पुत्र आमदार अमित देशमुख यांना नवे नेतृत्व म्हणून पुढे आणण्याचे प्रयत्न विलासराव समर्थकांनी सुरू केले आहेत.
देशमुख समर्थकांची एकजूट करून या गटाचे नेतृत्व अमित देशमुख यांना देण्यासाठी विलासराव देशमुख मित्र परिवार या बॅनरखाली पद्धतशीरपणे मोर्चेबांधणी सुरू असून यासाठी विलासरावांचे खंदे समर्थक व काँग्रेस नेते उल्हास पवार यांनी पुढाकार घेतला आहे. पवार-देशमुख हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.
शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर निर्माण झालेली नेतृत्वाची उणीव त्याकाळी विलासराव देशमुख यांनी भरून काढली होती. प्रचंड जनसंपर्क, प्रशासनावर पकड आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी धावून जाण्याची वृत्ती यामुळे संपूर्ण राज्यात विलासरावांचे समर्थक तयार झाले होते. मराठवाडा आणि विदर्भावर विलासरावांचे प्रेम अधिक होते. मुख्यमंत्री असताना त्यांनी वेळोवेळी या भागासाठी सढळ हस्ते मदत केली. मात्र, त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे समर्थक सैरभर झाले होते. मराठवाडा व विदर्भातील त्यांच्या समर्थकांपुढे नेतृत्वाची उणीव भासू लागली होती. ही पोकळी भरून काढण्यासाठी त्यांचे कट्टर समर्थक उल्हास पवार यांचे प्रयत्न आहेत.काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे तरुणांना अधिक प्राधान्य देत आहेत. राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकारणात नजिकच्या भविष्यात तुरुणांना अधिक व्हाव आहे. पक्षात जेव्हा केव्हा तरुणांना संधी दिली जाईल त्याचा लाभ मिळावा यादृष्टीने ही पावले टाकली जात आहे. अमित देशमुख यांनी वडिलांचे खंदे समर्थन स्थानिक नेत्यांच्या भेटी घेण्यास प्रारंभ केला आहे. राज्यात सर्व जिल्ह्य़ात विलासराव यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. या कार्यकर्त्यांची मेळावे आयोजित करून स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची मोट बांधण्यात येत आहे. लोकसभा आणि विधानसभेतील पराभवातून उभारी घेण्यासाठी सर्व नेत्यांनी गटबाजीला तिलांजली देणे आवश्यक आहे. सर्वानी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरच पक्षाला यश मिळेल, असे पक्षातील धुरिणांना वाटत आहे. अमित देशमुख पूर्व विदर्भात येण्यापूर्वी पश्चिम विदर्भात होते. त्याआधी त्यांनी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात दौरा केले. या दौऱ्यात ते वडिलांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतात. या कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने उभे करणे आणि राज्यात राजकारणात बळ प्राप्त करणे हे देशमुख यांची रणनीती आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर त्यांनी विदर्भावर लक्ष केंद्रित केले आहे. ते वडिलांच्या विदर्भातील समर्थकांच्या भेटीस आले आहेत. या दौऱ्यात ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकार व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर यांच्या भेटी घेणार आहेत. कार्यकर्त्यांसाठी त्यांनी भरपूर वेळ राखून ठेवला आहे. यावरून त्यांनी वडिलांच्या कार्यकर्त्यांना दिलेले महत्त्व लक्षात येते. विलासराव गेल्यानंतर कार्यकर्त्यांना पोरके वाटू लागले आहे. या कार्यकर्त्यांना आपल्या समर्थकांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न आहे. राजकीय बळ वाढवून तरुणांना मिळणाऱ्या संधीचे सोने करण्याची ही व्यूहरचना आहे.