वाघिणीच्या लढय़ापासून करोना याचिकेपर्यंतचा विधायक प्रवास

नागपूर : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून वेगवेगळया उपाययोजना करण्यात येत आहेत. पण, या आजाराची लागण झाली किंवा नाही, याची तपासणी अत्यंत महागडी असून सामान्यांच्या खिशाला परवडणारी नाही. ही तपासणी देशभरात मोफत करण्यात यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एका प्रकारणात दिले. विशेष म्हणजे, ही याचिका दाखल करणारा तरुण हा उपराजधानीतील आहे.

डॉ. जेरील बानाईत असे या तरुणाचे नाव आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेला जेरील हा काही वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्य़ातील नरभक्षी ठरवण्यात आलेल्या अवनी वाघिणीच्या मुद्याहून चर्चेला आला. अवनी वाघीण नरभक्षी नसून केवळ वन्यजीव व मानवी संघर्षांतून  तिने शिकार केल्याचा युक्तिवाद डॉ. जेरील यांचा होता. त्यामुळे तिला ठार मारण्याचे वनविभागाचे आदेश रद्द ठरवण्यासाठी लढा उभारला.  प्रशासन ऐकत नसल्याने उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या लढयात डॉ. जेरील हा अवनीला वाचवण्यात अपयशी ठरला. पण, त्याने वन्यजीवप्रेमींसह लोकांची मने जिंकली. आता करोनाने जगभरात थमान घातले  आहे. या विषाणूने आता भारतातही  पाय पसरायला सुरुवात केली असून त्याचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्याची आवश्यकता आहे. या विषाणूची लागण झाली किंवा नाही, याची तपासणी सध्या काही रुग्णालयातच सुरू आहे. पण, भविष्यात रुग्णसंख्या वाढली व लोकांनी खासगी प्रयोगशाळांत तपासणी करावी लागल्यास ती सर्वसामान्यांना परवडणारी नाही. या उद्देशातून त्याने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून डॉक्टर, परिचारिका व इतरांना सुविधा व साधणे पुरवण्यात यावे. महानगरांसह लहान शहरांमध्येही सुविधा द्याव्यात. लोकांची नि:शुल्क तपासणी व्हावी, आदी मागण्या केल्या. यातील बहुतांश मागण्यांवर सरकारने निर्णय घ्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या आदेशानंतर महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनीही डॉ. जेरीलच्या प्रयत्नाचे फेसबुकवर पोस्ट करून कौतुक केले आहे.

करोनाला हरवण्यासाठीच याचिका

करोना आता ग्रामीण भागातही पोहोचला आहे. याचा सामाजिक प्रादुर्भाव होण्याची भीती असून ती टाळण्यासाठी महानगरांसह ग्रामीण भागातही रुग्ण हाताळणारे डॉक्टर, परिचारिका व इतरांना संरक्षण साधणे पुरवण्यात यावीत, लोकांची मोफत तपासणी व्हावी, जेणेकरून अधिकाधिक लोकांची तपासणी करून प्रसार रोखण्यात यावा, या उद्देशाने ही याचिका करण्यात आली. यात आम्हाला यश मिळाले.

– डॉ. जेरील बानाईत, याचिकाकर्ता.