X

विमानतळ परिसरातील इमारतींचे सर्वेक्षण करणार

भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) रेड झोन परिसरात इमारत बांधकामासाठी नाहरकत प्रमाणात जारी करत असते.

निविदा प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ

विमानाचे उड्डाण (टेक ऑफ) आणि उतरण्यासाठी (लँडिंग) अडचणीच्या ठरणाऱ्या विमानतळ परिसरातील उंच इमारतीचे सर्वेक्षण करण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिल्या दोन निविदांमध्ये एका कंपनीने या कामासाठी तयारी दाखवलेली असून नियमानुसार किमान तीन कंपन्यांनी निविदा भरणे आवश्यक आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरवताना अडथळा निर्माण होत असल्याने नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (डीजीसीए) मिहान इंडिया लि. ला (एमआयएल) धावपट्टीची लांबी  वाढवण्याची सूचना केली आहे. असे केल्यास मोठे विमान उतरवता येणार नाही आणि नागपूर विमानतळाची क्षमता कमी होईल, त्यामुळे ‘एमआयएल’ने विमानतळाच्या ‘रेड झोन’मधील उंच इमारतींची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अनुभवी आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण ( एएआय) कडून मान्यताप्राप्त कंपनीकडून  हे काम केले जाणार आहे.

विमान उड्डाणाला जयताळा, चिंचभवन आणि खापरी भागातील ज्या उंच इमारतींचा अडसर निर्माण होतो अशा सर्व इमारतींची ओळख पटवून उंची कमी करण्याबाबत सूचना जारी करण्यात येणार आहे. ‘एमआयएल’ने या कामासाठी दोनदा निविदा काढली. दोन्हीवेळा एकाच  कंपनीने निविदा भरली. म्हणून तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आली आहे. पुढील पंधरा दिवसात  कंपनीची निवड अंतिम होईल आणि त्यापुढील महिनाभरात विमानतळासाठी धोकादायक ठरणाऱ्या इमारतींची यादी तयार केली जाईल. त्याबद्दल ‘डीजीसीए’ला कळवण्यात येईल.

भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) रेड झोन परिसरात इमारत बांधकामासाठी नाहरकत प्रमाणात जारी करत असते. ‘एमआयएल’ला त्याची प्रत दिली जाते. इमारतीच्या उंचीवर, बांधकामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ‘एमआयएल’ची आहे.

विमानतळाच्या धावपट्टीला धोका

‘एमआयएल’ विमानतळापासून २० किमी अंतरावरील उंच इमारतीचे सर्वेक्षण करत नाही. केवळ ३ ते ४ किमी परिसरातील इमारतीची उंची मोजण्यात येणार आहे. त्यापलीकडील उंच इमारती सध्यातरी धोकादायक नाहीत, परंतु ४ किमी परिसरातील इमारती फारच धोकादायक आहेत. त्या शोधून कार्यवाही केली नाही तर ५६० मीटरने धावपट्टी कमी करावी लागणार आहे. विमानतळ आहे तसे हवे असेल तर इमारतींचा धोका दूर करावा लागणार आहे. विमानतळाची समुद्र सपाटीपासूनची उंची आणि परिसरातील इमारतीचा पाया, याची उंची सारखी असल्यास पाच ते सहा मजली इमारत धोकायदायक कक्षेत येऊ शकते, परंतु विमानतळाची उंची परिसरातील इमारतीच्या पायाच्या उंचीपेक्षा कमी असल्यास सात-आठ मजली इमारत देखील चालू शकते, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ संचालक विजय मुळेकर यांनी सांगितले.

इमारतींची पाहणी

विमानतळापासून ३ ते ४ किमी अंतरावरील उंच इमारतींची उंची मोजण्यात येणार असून विशेषत: जयताळा, चिंचभवन परिसरात इमारतींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. हे सर्व अस्तित्वात असलेल्या विमानतळाला वाचण्यासाठी केले जात आहे. प्रस्तावित दुसऱ्या धावपट्टीसाठी अजून झोन मॅपिंग देखील झालेली नाही.