अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नागपूरमधून सुन्न करणारी घटना समोर आली आहे. सुशांतचा चाहता असलेल्या १४ वर्षीय नयन मगनानी या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नयन मगनानी दिवंगत अभिनेता सुशांतचा फॅन होता आणि त्याच्या जाण्याने तो खूप तणावामध्ये होता. तणावातून नयन याने घरातील सीलिंग फॅनला लटकून गळफास घेतला. शहरातील जरीपटका परिसरातील हेमू कॉलनी चौक याठिकाणी ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रकुमार मगनानी हे शहरातील नामांकित बिल्डींग मटेरियल सप्लायर आहेत. त्यांचा मुलगा नयनकुमार हा दहावीचा विद्यार्थी असून त्याला मोबाईलचे वेड होतं. घरात आईचा मोबाईल घेऊन तो सतत खेळायचा. त्यामुळे त्याला स्वतःच्या हक्‍काचा मोबाईल पाहिजे होता. त्याने आई-वडीलांना मोबाईल घेऊन मागितला होता. मात्र, त्यांनी दहावी पास झाल्यावर मोबाईल देईल, असे नयनला आश्‍वासन दिले. गेल्या काही दिवसांपासून नयन पुन्हा मोबाईल विकत घेऊन देण्यासाठी आईकडे तगादा लावायला लागला होता. मात्र, त्याच्या मागणीकडे आई-वडिलांनी दुर्लक्ष केले. मुलाने हट्‌ट केल्यामुळे त्याची समजूत घालून वेळ मारून नेण्यात आली. शेवटी त्याने बुधवारी दुपारी साडेचार वाजता घरात घरात सिलींग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. खूप वेळ झाला तरी नयन बाहेर आला नाही, म्हणून त्याची आई रूममध्ये गेली. नयन अडकलेल्या अवस्थेत पाहून अचानक धक्‍का बसला. त्यांनी जोरात हंबरडा फोडला. नयनच्या आत्महत्येप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

आत्महत्येची दिली होती धमकी

“मला मोबाईल घेऊन न दिल्यास मी आत्महत्या करेन’, चक्‍क अशी धमकी नयनने आई-वडिलांना दिली होती. मात्र, लहान मुले रागाच्या भरात असे काहीही बोलतच असतात, असे समजून त्याच्याकडे पालकांनी दुर्लक्ष केले. मात्र, आई-वडील आपल्यावर प्रेम करीत नसल्याची भावना निर्माण झाल्यामुळे नयनने गळफास घेऊन आत्महत्या करीत जीवनयात्रा संपविली.