सीताबर्डीत पाचवा गुन्हा दाखल

नागपूर : शिवसेनेचे निलंबित शहर प्रमुख मंगेश कडव याच्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात पाचवा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सोमवारी गुन्हे शाखा पोलिसांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्य़ात त्याची पत्नी रुचिता मंगेश कडव हिला अटक केली.

एक आठवडय़ापूर्वी कडव याच्यावर २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप होताच तो चर्चेत आला. विक्रम मधुकर लाभे यांच्या भरतनगरमधील पुराणिक लेआऊट येथील बंगल्यावर ताबा घेऊन घरातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी कडव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर सक्करदऱ्यातील बिल्डर देवानंद शिर्के यांना ठार मारण्याची धमकी देऊन २० लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी कडव याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. याचप्रमाणे मानेवाडय़ातील अमरिवा अपार्टमेंटमधील फ्लॅटचे पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी कडव व त्याच्या पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर विकास रामकृष्ण चौधरी (४४) रा. कस्तुरबा लेआउट, बजाजनगर यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनीही गेल्या बुधवारी दीड लाख रुपयांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आता सीताबर्डी ठाण्यातही गुन्हा नोंदवण्यात आला. एका तरुणाला रेल्वेमध्ये तिकीट तपासणीसाची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली ६ लाख रुपयांनी गंडवल्याप्रकरणी सोमवारी पाचवा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तो फरार झाला व पत्नी रुचिता ही छातीत दुखण्याचे निमित्त करून सदरमधील व्हीम्स रुग्णालयात दाखल झाली होती.

महिलेकडून लोकांना धमकी

मंगेश कडवची अधिकृत पत्नी रुचिता असून त्याचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते. तिच्यासोबत तो पत्नीप्रमाणेच राहात होता. अनेक गुन्ह्य़ांमध्ये दुसरी पत्नी सहभागी असल्याचा जबाब पहिल्या पत्नीने पोलिसांसमोर दिला असल्याची माहिती आहे. तसेच कडव याची मदत करण्यासाठी ती लोकांना भ्रमणध्वनी करून धमकावत असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय त्याच्या संपत्तीचा लाभ घेणारे व त्याच्यावर मौजमजा करणाऱ्या इतर नातेवाईकांवरही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली.