News Flash

न्यायाधीश लोया यांचा मृत्यू : घातपात नाही?

मृत्यू संशयास्पद असल्याच्या वृत्तावरून देशभर वादळ उठले आहे

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

गुजरातमधील सोहराबुद्दीन खून खटल्याच्या सुनावणीसाठी नियुक्त करण्यात आलेले सीबीआय न्यायालयाचे न्यायधीश ब्रीजगोपाल लोया यांचा मृत्यू संशयास्पद असल्याच्या वृत्तावरून देशभर वादळ उठले असले तरी तीन वर्षांपूर्वी नागपुरात घडलेल्या या घटनेतील परिस्थितीजन्य पुरावे मात्र वेगळ्याच दिशेने जाणारे आहेत. लोया यांचा मृत्यू  हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता व त्यात कोणताही घातपात नव्हता, असे या प्रकरणाशी संबंध आलेल्या सर्वाचेच म्हणणे आहे.

सध्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती असलेल्या स्वप्ना जोशी यांच्या कन्येच्या विवाहासाठी लोया येथे आले होते. येथील रविभवनात त्यांचा मुक्काम होता. यासंदर्भात रविभवनाच्या आरक्षण कक्षातील कागदपत्रे तपासली असता लोया यांच्या नावाने कोणताही कक्ष आरक्षित नव्हता, असे आढळून आले. या लग्नासाठी उच्च न्यायालय प्रशासनाकडून पाच कक्ष आरक्षित करण्यात आले होते. त्यात कोण थांबणार, याची यादी मात्र देण्यात आली नव्हती. हा कक्ष कदाचित त्यांच्यासोबत असलेल्या इतर न्यायाधीशांच्या नावाने आरक्षित असावा, असे रविभवनातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

एक डिसेंबर २०१४ च्या पहाटे त्यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना तेव्हा सोबतच्या सहकारी न्यायाधीशांनी जवळच्या दंदे रुग्णालयात नेले. इसीजी त्यांच्या हृदयाची स्थिती असामान्य आहे, असे दर्शवणारा होता. लगेच डॉक्टरांनी त्यांना हृदयरोगतज्ज्ञ असलेल्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला व जवळ असलेल्या वोक्हार्टचे नाव सुचवले. मात्र, लोयांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मेडिट्रिना रुग्णालयात नेले. तोवर त्यांचा मृत्यू झाला होता. लोयांना रविभवनातून दंदेंच्या रुग्णालयात उच्च न्यायालयाच्या उपनिबंधकांच्या वाहनाने नेण्यात आल्याचे समजते. मात्र, दंदे रुग्णालयातील डॉक्टरांनी ते कोणत्या वाहनाने आले हे ठाऊक नसल्याचे सांगितले. यासंदर्भात डॉ. पिनाक दंदे यांच्याशी संपर्क साधला असता प्राथमिक तपासणीत त्यांना हृदयविकार असल्याचे आढळून आले व त्यामुळेच त्यांना मोठय़ा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला, असे सांगितले. आमच्या रुग्णालयात काढण्यात आलेला इसीजी व प्राथमिक उपचाराची सारी कागदपत्रे तेव्हाच त्यांना देण्यात आली होती.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळी सहाच्या सुमारास मेडिट्रिना रुग्णालयात उच्च न्यायालयाचे काही न्यायमूर्ती जमले. त्यांनाही रुग्णालयाकडून हृदयविकाराने मृत्यू झाला असेच सांगण्यात आले. नंतर लोयांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. तेथे कर्तव्यावर असलेले डॉ. तुमराम यांनी शवविच्छेदन केले. त्यातही त्यांचा मृत्यू हृदय बंद पडून झाला असा निष्कर्ष नोंदवण्यात आला.

यासंदर्भात डॉ. तुमराम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आता त्या शवविच्छेदनासंदर्भात काहीही आठवत नाही. मात्र, त्या प्रकरणात शंका घेण्यासारखे काहीही नव्हते, असे ते म्हणाले.

या घटनेची माहिती लोया यांच्या कुटुंबाला सकाळी मुंबई व लातूरला देण्यात आली. त्यानंतर या कुटुंबाचे एक परिचित ईश्वर बाहेती (त्यांचे लातूरला मेडिकलचे दुकान आहे) व लोयांचे मावसभाऊ जकोटिया यांनी पुढाकार घेत लोयांचे शव लातूरला आणण्यासाठी धावपळ केली. जकोटिया यांनी त्यांचे नातेवाईक असलेले डॉ. प्रशांत राठी यांना फोन केला. ते सकाळी सहाच्या सुमारास मेडिट्रिना रुग्णालयात पोहोचले. तेव्हा तिथे अनेक न्यायमूर्ती हजर असल्याचे त्यांनी पाहिले. नंतरची धावपळ डॉ. राठी यांनीच केली व कुटुंबाच्या सुचनेवरुन मृतदेहाचा ताबा घेऊन तो लातुरकडे रवाना केला. लोया यांच्या कपडय़ांवर रक्ताचे डाग होते, असे म्हटले जात असले तरी शवविच्छेदन अहवालात मात्र त्यांचे कपडे ‘ड्राय’ होते, असा उल्लेख आहे. मात्र, आताच्या वादाच्या पाश्र्वभूमीवर यासंदर्भात अधिकृतपणे कुणीही बोलायला तयार नाही.

रक्त वाहिनीत अडथळे

लोयांच्या मृतदेहातील काही भाग काढून ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्या अहवालात लोयांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या डाव्या वाहिनीला जोडणाऱ्या वाहिनीत अडथळे निर्माण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे नमूद असल्याचे न्यायवैद्यक विभागातील डॉक्टरांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2017 1:05 am

Web Title: suspicious death of cbi judge brij gopal loya
Next Stories
1 ‘सधन व्यक्तीने आरक्षणाचा आर्थिक लाभ घेणे ही लाचारी’
2 महाराष्ट्रातील विकास विषमता वाढवणारा
3 मेट्रोच्या सुरक्षा उपायांवर प्रश्नचिन्ह
Just Now!
X