देशभरातील शहरांच्या यादीत उपराजधानी १३७ व्या क्रमांकावर

केंद्र सरकारने देशभरातील स्वच्छ शहराची यादी जाहीर केली असून त्यात उपराजधानीचे शहर असलेले नागपूरचे मानांकन घसरले आहे. गेल्यावर्षी देशभरात २३व्या क्रमांकावर असलेले नागपूर यावेळी १३७ व्या तर महाराष्ट्रात १२ व्या स्थानावर आले आहे.

स्वच्छ शहराची निवड करण्यासाठी केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयातर्फे देशभरातील शहराचे सर्वेक्षण केले जाते.

सर्वेक्षणात नागपूरला पहिल्या दहा शहरामध्ये स्थान मिळावे, यासाठी महापालिकेने केलेले प्रयत्न थिटे पडले आणि क्लिन सिटीमध्ये नागपूर तब्बल १३७ व्या क्रमांकावर गेले. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी स्वच्छ नागपूरची घोषणा करीत असले तरी तरी शहर स्वच्छ नाही हे केंद्र सरकारनेच स्पष्ट केले.

नगरविकास मंत्रालयातर्फे देशातील ५०० प्रमुख शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी तज्ज्ञाची चमू चार महिन्यांपूर्वी नागपुरात आली होती. त्यांनी शहरातील विविध भागांना भेटी देऊन पाहणी केली आणि नागरिकांशी चर्चा केली होती. या दरम्यान उत्तर आणि पूर्व नागपुरातील नागरिकांनी स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली होती. आज नगरविकास मंत्रालयाने स्वच्छ शहरांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात नागपूर १३७ व्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले.

घसरण सातत्य

२०१४-१५ मध्ये ‘क्लिन सिटी’च्या देशव्यापी स्पर्धेत नागपूर ४२६ शहरामधून २५६ व्या क्रमांकावर होते. २०१५-१६ मध्ये देशातील ५०० शहराचे सर्वेक्षण करण्यात आले त्यात नागपूर २३ व्या क्रमांकावर होते.  २०१७ मध्ये १३७ स्थानावर गेले.

सिमेंट रस्त्यामुळे फटका

गेल्यावर्षी २३ व्या क्रमांकावर नागपूर शहर असल्यामुळे यावेळी पहिल्या १० शहरांमध्ये राहू, असा प्रयत्न करण्यात आला, मात्र शहरात सिमेंट रोडशिवाय विविध प्रकल्पाची कामे सुरू असल्यामुळे आणि त्यावर असलेल्या धुळीमुळे स्वच्छतेच्या यादीत क्रमांक घसरल आहे. कनककडे कचरा उचलण्याचे कंत्राट आहे, मात्र पुढच्या वर्षी पहिल्या १० मध्ये राहण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

नंदा जिचकार, महापौर, नागपूर महापालिका