हिंदू मुस्लीम कुटुंबीयांच्या सामंजस्याने दोघांना जीवदान
रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने स्वत:ची एक किडनी दुसऱ्याला दान देऊन जीवदान दिल्याची अनेक प्रकरणे आपण बघितली आहेत, परंतु घरच्या सदस्याची किडनी दुसऱ्याशी जुळत नसल्याने हिंदू व मुस्लीम कुटुंबीयांनी सामंजस्य दाखवत किडनी दान देऊन एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. नागपुरात ‘स्व्ॉप’ पद्धतीची झालेली ही पहिली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया असून त्यामुळे दोघांना जीवदान मिळाले आहे.
खामगाव येथील विनोद ससाने (३२) किडनी खराब झाल्याने दररोजच्या डायलेसिसला त्रासून गेले होते. त्यांचा रक्तगट नातेवाईकांच्या रक्तगटाशी जुळत नसला तरी होणाऱ्या त्रासामुळे त्यांनी किडनी प्रत्यारोपणाचा हट्ट डॉक्टरांकडे धरला होता. डॉक्टरांनी त्यांना ‘स्व्ॉप’ पद्धतीच्या किडनी प्रत्यारोपणाची माहिती दिली. त्यानुसार इतर कुटुंब तयार असल्यास दोन्ही कुटुंबात किडनी एकमेकांना देऊन प्रत्यारोपण कायद्यानुसार करता येत असल्याचे त्यांना समजले. नागपूर जिल्ह्य़ातील कामठी येथील मोहम्मद शब्बीर यांच्याबद्दलही असाच प्रकार घडला.
दोन्ही कुटुंबीयांनी एकत्र येऊन धर्माला बाजूला सारत एकमेकांना किडनी देण्यास इच्छुक असलेल्यांची किडनी दोन्ही रुग्णांशी जुळते काय? हे तपासण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रुग्ण विनोद ससाने यांचे वडील अशोक ससाने यांची किडनी मोहम्मद शब्बीर सोबत आणि मोहम्मद शब्बीर यांची पत्नी रझिया यांची किडनी विनोद ससाने यांच्यासोबत जुळत असल्याचे तपासाअंती समजले. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला. २५ मे रोजी एकाच वेळी वोक्हार्ट रुग्णालयातील चार शस्त्रक्रिया गृहात दोन दाते व दोन किडनी प्रत्यारोपण होणारे रुग्ण यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रिया सकाळी ९.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत चालल्या. ‘स्व्ॉप’ पद्धतीची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे, असे किडनी शल्यचिकित्सक डॉ. संजय कोलते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.