महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दिलासा

महापालिकेच्या शिक्षण विभागाने दीड वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या स्वेटरचे अखेर शहरातील काही निवडक शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. मात्र, स्वेटरचा दर्जा बघता ते किती दिवस टिकतील हा प्रश्न आहे.

जून २०१७ मध्ये महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटपाची घोषणा शिक्षण विभागाने केली होती. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी  दिल्यावर  निविदा काढण्यात आल्या. डिसेंबर २०१७  दरम्यान विद्यार्थ्यांना स्वेटर  मिळतील,अशी अपेक्षा होती. मात्र जवळपास वर्षभरानंतर आता त्याचे वाटप करण्यात आले. बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात सत्ताधारी पक्षाचे नेते संदीप जोशी यांच्या हस्ते काही निवडक विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले. स्वेटरच्या दर्जाबाबत अनेक मुलांच्या पालकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

स्वेटर असो, गणवेश असो, पुस्तके असो, या सर्व सोयी वेळेच्या आत विद्यार्थ्यांना मिळाव्यात, यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न असतात. यंदा हिवाळा सुरू होण्यापूर्वी स्वेटर वाटप व्हावे, अशी विभागाची इच्छा होती. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांना स्वेटर उपलब्ध करून देऊ शकलो. आठवडाभरात सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना स्वेटर मिळेल, असा विश्वास शिक्षण समितीचे सभापती दिलीप दिवे यांनी व्यक्त केला.