महेश बोकडे

अतिसाखरेमुळे इन्सुलिनचे प्रमाण वाढते; सिर्टिक, फॉस्फरस अ‍ॅसिडचाही दुष्परिणाम

शीतपेय (कोल्ड्रिंग) हा तरुणाईच्या अतिशय आवडीचा विषय आहे. तास-दीड तासाच्या निवांत गप्पा असतील किंवा दीर्घकाळ चालणारी पार्टी. हातात  शीतपेय असलेच पाहिजे, असा या तरुणाईचा अघोषित आग्रह असतो. मध्यमवयीन पुरुष, महिला, बालकांनाही शीतपेयाचे प्रचंड आकर्षण आहे, परंतु सर्वाच्या आवडीचे हे शीतपेय आरोग्याच्यादृष्टीने मात्र हानिकारक ठरत आहे. या शीतपेयामुळे पचन पक्रिया बिघडण्यासोबतच लठ्ठपणा, दात व हाडांचे विकारही वाढत आहेत.

शीतपेय अन्न पचवण्यास मदत करत असल्याचा अनेकांचा समज आहे. मात्र, हा समज चुकीचा असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याचे कारण, हे पेय काबरेनेड पाण्यापासून तयार केले जाते. हे गोड काबरेनेड पाणी कृत्रिम चव असलेल्या रासायनिक घटकापासून तयार होते. ते बनवण्यासाठी कॉर्बन डायऑक्साईड  गॅसचा वापर केला जातो. सोबत या पेयात सिर्टिक अ‍ॅसिड, फॉस्फरस अ‍ॅसिडचाही वापर होतो. हे सर्व रायासनिक घटक मानवी शरीरात मोठय़ा प्रमाणात गॅस तयार करतात. त्यामुळे पचन क्रिया चांगली होण्याऐवजी बिघडते. त्यामुळे अनेकांना पोटात गडबड होत असल्याचे दुसऱ्या दिवशी लक्षात येते. नागपूरच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील गॅस्ट्रोइंट्रोलॉजी विभागातच रोज सुमारे २५० च्या जवळपास नागरिक पोटाशी संबंधित विविध आजार घेऊन येतात. त्यातील सुमारे १५ ते २० रुग्णांनी एक दिवसापूर्वी विविध खाद्यपदार्थासोबत शीतपेय पिल्याचा इतिहास डॉक्टरांच्या निदर्शनात आला आहे. या ३५० एमएल एवढय़ा पेयात १० चमचाच्या बरोबरीने साखर असते. वास्तविक एकावेळी एवढे गोड पदार्थ शरीरात गेले तर माणसाला मळमळ, ओकारीचा त्रास होऊ शकतो, परंतु शीतपेय पिल्यावर तसे होत नाही. कारण या पेयात फॉस्फरस अ‍ॅसिड असते. त्यामुळे या पेयाचा गोडपणा कमी होतो.

लठ्ठपणा वाढतो

शीतपेयात जास्त प्रमाणात साखर असल्यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण झपाटय़ाने वाढते. ते नियंत्रणात आणण्यासाठी आपले यकृत जास्त साखरेचे रूपांतर फॅटमध्ये करते. ज्या लोकांना जास्त शीतपेय पिण्याची सवय असते, त्यांचे वजन सामान्य नागरिकांच्या तुलनेत तिपटीहून जास्त वेगाने वाढते. मधुमेहग्रस्तांनी हे पेय पिणे योग्य नाही. ते पिल्याने त्यांच्या शरीराचे नुकसान होते.

हाडांसह दातांवरही गंभीर परिणाम

शीतपेयातील कॉर्बन डायऑक्साईड आणि फॉस्फरस अ‍ॅसिड  मानवी हाडांना आणि दातांना अशक्त बनवतात. सोबत या पेयात असलेल्या कॅफेनमुळे दातातले कॅल्शियम कमी होऊन दात खराब होण्यास सुरुवात होते. कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधनानुसार, जे लोक आठवडय़ात १४ बाटल्या  शीतपेय पितात ते सामान्य लोकांपेक्षा अधिक आक्रमक होतात. सोबत जे लोक रोज असे पेय पितात त्यांच्यात तणावाची समस्या अधिक दिसून येते. हा त्रास लहान मूल आणि युवकांमध्ये जास्त दिसतो.

– डॉ. अभय दातारकर, दंत शल्यचिकित्सक, शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर.

लिंबूपाणी, नारळपाणी फायद्याचे

जेवणापूर्वी किंवा जेवल्यावर शीतपेय पिल्यास पोटात गॅस तयार होऊन अ‍ॅसिडिटीसह इतरही त्रास संभवतात. त्याकडे लक्ष न दिल्यास पुढे छातीदुखी, गॅस्ट्राइटीस, अतिसार, अपचनसह इतरही गंभीर आजार होऊ शकतात. सुपरस्पेशालिटी रुग्णालयात हल्ली पोटाशी संबंधित आजाराचे रुग्ण वाढत आहेत. पैकी अनेकांचा इतिहास बघितल्यास त्यांनी एक-दोन दिवसांपूर्वी हे शीतपेय पिल्याचेही पुढे येते. सामान्य नागरिकांनी या पेयाच्या ऐवजी नैसíगकरित्या तयार होणारे लिंबूपाणी, सरबत, नारळाचे पाणी पिणे जास्त चांगले आहे.

– डॉ. सुधीर गुप्ता, गॅस्ट्रोइंट्रोलॉजिस्ट, सुपरस्पेशालिटी रुग्णालय, नागपूर.