News Flash

जलतरण तलाव बंद, सराव करायचा कुठे?

करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून जलतरण केंद्र बंद असल्याने जलतरणपटूंनी सराव करायचा कुठे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.

शहरातील जलतरणपटूंचा प्रशासनाला सवाल

नागपूर : करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून जलतरण केंद्र बंद असल्याने जलतरणपटूंनी सराव करायचा कुठे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. विशेष म्हणजे, आता सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारांना परवानगी देण्यात आली आहे. सरावाअभावी पालकांना जलतरणपटूंच्या भविष्याची चिंता सतावत आहे.

करोनामुळे गतवर्षी २० मार्चपासून सरकारने सर्व क्रीडा प्रकारावर बंद घातली होती. तीन महिन्यानंतर मात्र र्निबधात शिथिलता मिळाली ती टप्प्याटप्प्याने. अशात सहा महिन्यानंतर केवळ मदानी क्रीडा प्रकारांच्या सरावासाठी परवानगी मिळाली, परंतु स्पध्रेला नाही. त्यानंतर पहिली लाटेनंतर दुसरी लाट आली. या लाटेत बाधितांच्या मृत्यूचे तांडव बघायला मिळले. परिणामी, प्रशासनाकडून सकाळच्या फिरण्यावरही बंद घालण्यात आली आणि पुन्हा टाळेबंदी जाहीर झाली. मात्र आता करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. त्यामुळे सरकारने एका-एका क्रीडा प्रकाराला परवानगी दिली. आता केवळ जलतरण वगळता सर्व प्रकारच्या क्रीडांच्या सरावाला परवानगी देण्यात आली आहे. केवळ जलतरण केंद्र बंद आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून जलतरणपटूंची सरावाअभावी जलतरणपटूंची घरातच घुसमट होत आहे. शहरात सहा जलतरण केंद्र असून ते दोन वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडण्याची दाट शक्यता जाणकार व्यक्त करत आहे. दरम्यानच्या काळात बहुतांश जलतरणपटूंचे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण होणार होते. मात्र त्यांनाही मोठा फटका बसल्याने पालक चिंतेत आहेत. शहरातील काही राष्ट्रीय जलतरणपटूंची आंतरराष्ट्रीय स्पध्रेसाठी निवड होण्याची दाट शक्यता होती. मात्र करोनामुळे ही संधी हिरावली गेली.

यासंदर्भात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जलतरण संघटनांनी वारंवार बठका घेऊन अनेक निवेदने दिली. केंद्र व राज्य सरकारकडे जलतरण केंद्र कधी सुरू होणार अशी विचारणा केली. मात्र अजूनही कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही. मात्र ऑगस्ट महिन्यात सराव सुरू होतील, असे संघटनांचे पदाधिकारी सांगत आहे. त्यामुळे आता जलतरणपटूंना शून्यापासून सुरुवात करावी लागणार असे प्रशिक्षक सांगत आहेत.

अंबाझरी तलावावर गर्दी

जलतरण तलाव जरी बंद असले तरी पालक आपल्या मुलांना घेऊन अंबाझरीच्या तलावावर दररोज सरावासाठी येत आहेत. त्यामुळे येथे रोज सकाळी व सायंकाळी येथे पोहणाऱ्यांची गर्दी होत असते. अशात ज्या कारणामुळे जलतरण तलावावर बंदी आहे त्या करोनाचा प्रार्दुभाव अंबाझरीत देखील होण्याची शक्यता आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

दोन वर्षांपासून जलतरण तलाव बंद असल्याने आपल्याकडील दर्जेदार खेळाडू चांगल्या कामगिरीला मुकत आहेत. आता करोना आटोक्यात आला असून किमान जिल्हा स्तरावरील जलतरणपटूंना सरावाची परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही क्रीडामंत्र्यांना केली आहे. केंद्राकडून सूचना येताच परवानगी देऊ, असे मंत्र्यांनी सांगितले आहे.

– संभाजी भोसले सहसचिव, स्वीमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 1:12 am

Web Title: swimming pool closed where to practice ssh 93
Next Stories
1 एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी
2 मेडिकल- मेयो रुग्णालयांतील रुग्णांचा जीव टांगणीला!
3 जी-७ परिषदेतील चर्चेत औष्णिक विद्युत प्रकल्पाचा मुद्दाच नाही
Just Now!
X