पाच दिवसांत १३ नवीन रुग्णांची भर

उपराजधानीत नवीन वर्षांत स्वाईन फ्लू रुग्णांची मृत्यू संख्या वाढत आहे. आणखी एका महिलेचा मृत्यू या आजाराने झाल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये या आजाराचे १३ नवीन रुग्ण शहरातील विविध खासगी रुग्णालय उपचार घेत आहेत.

आदित्य रुग्णालयात दगावलेली ४७ वर्षीय महिला ही अमरावती जिल्ह्य़ातील शिवनगाव येथील रहिवासी आहे. सर्दी, खोकला, तापासह इतर स्वाईन फ्लूसदृश्य आजाराच्या लक्षणामुळे तिला प्रथम जवळच्या रुग्णालयात व त्यानंतर आदित्य रुग्णालयात नातेवाईकांनी दाखल केले होते. तिला स्वाईन फ्लू असल्याचे निदान झाले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

विभागातील सहा जिल्ह्य़ात १ जानेवारी २०१९ पासून २८ दिवसांमध्ये या आजारामुळे दगावलेल्यांची संख्या आता सहावर पोहोचली आहे, तर या कालावधीत या आजाराची लागण झालेल्यांची संख्याही आता ३५ वर पोहोचली आहे. १३ नवीन रुग्ण आहेत. न्यू ईरा रुग्णालयात सध्या एक रुग्ण व्हेंटिलेटरवर तर दुसरा रुग्ण एका वार्डात उपचार घेत आहे.

डेंग्यूचे ३४ रुग्ण आढळले

उपराजधानीत १ जानेवारी २०१९ पासून आजपर्यंत ३४ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. त्यातील सर्वाधिक २० रुग्ण हे नागपूर शहरातील आहे, तर नागपूर ग्रामीणमधील पाच जणांनाही हा आजार झाला आहे. वर्धा आणि गडचिरोलीतही प्रत्येकी एका रुग्णाला डेंग्यू झाला असून त्यावर तेथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.