राज्यात मृतांची संख्या २७६ वर

नागपूरसह राज्याच्या काही भागात स्वाईन फ्लूचा प्रकोप पुन्हा वाढला असून गेल्या सहा महिन्यात यामुळे राज्यात बळींची संख्या २७६ वर पोहचली आहे. सर्वाधिक रुग्ण दगावलेल्या शहरांत नागपूर तिसऱ्या क्रमांकावर असून योग्य काळजी न घेतल्यास ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

नागपूरसह राज्याच्या विविध भागांत प्रथमच पावसाळ्यातही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत. उन्हाळ्यातील जास्त तापमानात हे विषाणू सहसा नाहिसे होतात. परंतु यंदा ते या वातावरणात कायम आहे. त्यातच राज्याच्या विविध भागात पडलेल्या पावसामुळे तापमानात मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. हे वातावरण स्वाईन फ्लू विषाणूंसाठी पोषक असून त्यामुळे साथ आणखी बळावण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार राज्यातील सर्वाधिक ९९ मृत्यू हे पुणे विभागात नोंदवण्यात आले. त्या खालोखाल नाशिक विभागात ३९ तर नागपूर विभागात ३६ जण दगावल्याची नोंद आहे. नाशिकमध्ये ३९, औरंगाबाद ३३, अकोला विभागात २२, ठाण्यात १६, मुंबईत १६, कोल्हापूर विभागात ११ मृत्यूची नोंद असून सर्वात कमी ५ मृत्यूची नोंद लातूर विभागात आहे. राज्यभरात आजपर्यंत तब्बल २ हजार १२४ जणांना स्वाईन फ्लूची बाधा झाली. पावसाळ्यात साथीवर नियंत्रणाकरिता आरोग्य विभागाकडून सर्व शासकीय रुग्णालयांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

इमारत ठरली शोभेची वास्तू

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मेडिकलमध्ये स्वाईन फ्लू वॉर्डासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात आली. परंतु शासनाकडून या इमारतीत रुग्णांसाठी फर्निचर, खाटा, कर्मचारी उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे ही इमारत शोभेची वस्तू ठरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातील ही स्थिती असल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांत उपचार कधी?

शहरातील स्वाईन फ्लू रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी नागपूर महापालिकेची आहे. परंतु महापालिकेच्या एकाही रुग्णालयांत उपचाराची सोय नाही. २०१५ मध्ये नागपूरला स्वाईन फ्लूचे सर्वाधिक मृत्यू झाले होते. त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीने महापालिका रुग्णालयांची पाहणी केली. त्यांच्या निदर्शनात असुविधांचा प्रकार आल्यावर त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली व महापालिकेच्या रुग्णालयात सोयी करण्याच्या सूचना दिल्या. परंतु अद्यापही शहरातील एकाही रुग्णालयांत रुग्णांवर उपचाराची सोय नाही.