‘स्वाइन फ्लू’ प्रतिबंधक लस तुटवडा

येथील मेडिकल आणि मेयो रुग्णालयात गर्भवतींसाठी एकही स्वाइन फ्लू प्रतिबंधित लस उपलब्ध नसून डागा रुग्णालयातही तुटवडा आहे. त्यामुळे लसीकरण पुन्हा थांबले आहे. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना याबाबत विचारले असता त्यांनी महापालिकेकडे बोट दाखवले.

राज्यात स्वाइन फ्लू मृत्यूत विदर्भाचा क्रमांक वरचा आहे. सर्वाधिक ६२ मृत्यू हे केवळ नागपूर जिल्ह्य़ातील आहे. ही संख्या वाढतच असून शहरातील सर्व शासकीय रुग्णालयात पुन्हा स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा आहे. गर्भवतींना स्वाइन फ्लू होण्याचा धोका असल्याने त्यांना सर्व शासकीय रुग्णालयात इच्छेनुसार प्रतिबंधात्मक लसी देणे शासनाने सुरू केले. नागपूर जिल्ह्य़ात वर्षांला मेडिकल, मेयो आणि डागा आणि महापालिकेच्या रुग्णालयात ४० हजारांवर प्रसूती होतात. त्यानुसार प्रतिबंधात्मक लसी उपलब्ध होणे अपेक्षित आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून सर्वच शासकीय रुग्णालयांत तुटवडा आहे. आरोग्य विभागाने जिल्हा शल्य चिकित्सकांना स्थानिक स्तरावर लस खरेदी करण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु त्याकरिता फार कमी निधी असल्याने अडचणी येत आहे. सध्या डागा रुग्णालयातच २५ हून कमी लस उपलब्ध असून मेडिकल, मेयोत एकही लस नाही. त्यामुळे गर्भवतीला स्वाइन फ्लूची लागण झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विधिमंडळ परिसरात शुक्रवारी पत्रकारांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रतिबंधात्मक लस खरेदीबाबत राज्यातील सर्व महापालिकांना सांगितले. ही त्यांची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात कोणत्याही संस्था वा विभागाचा दोष असला तरी शेवटी सर्वसामान्य नागरिकच भरडल्या जात आहे.

आणखी एक मृत्यू

नागपुरात शुक्रवारी विनीत गजभिये (३१) रा. सहयोग नगर, नारी रोड, पॉवरग्रीड कार्यालयाच्या मागे, नागपूर या रुग्णाचा ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या अहवालात करण्यात आली. विनीतवर अ‍ॅलक्सीस हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होता. या मृत्यूमुळे शहरातील स्वाइन फ्लू बळींची संख्या ४७ वर पोहचली आहे.

डागा रुग्णालयात ४० टक्के प्रसूती

नागपुरातील वर्षांच्या ४० हजार प्रसूतींपैकी ४० टक्के प्रसूती (१५ हजारपेक्षा जास्त) डागा या शासकीय रुग्णालयात होतात. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या रुग्णालयांना अधूनमधून थोडय़ा लसी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय देत असले तरी मेडिकल, मेयोतील पुरवठा बंद असल्याची सूत्रांची माहिती आहे.

स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा असलेल्या जिल्ह्य़ात शल्यचिकित्सक पातळीवर लसींची खरेदी होत आहे. आरोग्य विभागाने सर्व महापालिकांना स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस खरेदीच्या सूचना पत्र लिहून केल्या आहे. त्या न केल्याने काही शहरात हा तुटवडा आहे. महापालिकांनी लस खरेदी करायला हव्या.”

डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री