वनविभागातील त्रुटी उघड; यंत्रणेच्या सज्जतेवर प्रश्नचिन्ह

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पालगतच्या ब्रम्हपुरी परिसरात घडलेल्या मानव-वन्यजीव संघर्षांच्या घटनेत वाघाला बेशुद्ध करण्यावरुन आणि त्यासाठी वनखात्याने शिकाऱ्याची मदत घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी वन्यजीव विभागातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. तरीही वनखात्याने त्यासाठी शिकाऱ्याला दिलेल्या आमंत्रणातून वन्यजीव विभागातील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत.

मानव-वन्यजीव संघर्षांच्या वाढलेल्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर वनखात्याची यंत्रणा सज्ज असणे गरजेचे असताना एका बाहेरच्या व्यक्तीकडे मदतीची याचना करावी लागणे हे वनखात्याचे अपयश मानावे का? यावरून प्रश्नचिन्हांची मालिका सुरू झाली आहे. वन्यप्राणी बेशुद्धीकरण हा या विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्याचा एक भाग आहे. मात्र, विभागात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच अधिकारी त्यासाठी सक्षम आहेत. वन्यप्राणी बेशुद्धीकरणाच्या प्रक्रियेत नागपुरच्या सेमिनरी हिल्सवरील वनरक्षक गुणवंत खरबडे हा राज्यातील पहिला तज्ज्ञ असावा. या वनरक्षकाने जिवावर उदार होऊन, पण अभ्यासपूर्ण पद्धतीने अशी प्रकरणे यशस्वीरीत्या हाताळली. किंबहुना त्याच्या हाताखाली वनखात्याचे अनेक अधिकारी-कर्मचारी तयार झाले. त्यानंतर सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी अजय पिलारी सेठ, सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी किशोर मिश्रीकोटकर, विभागीय वनाधिकारी गिरीश वशिष्ठ अशी मोजकीच नावे या तज्ज्ञांच्या यादीत घेतली जातात. शिकाऱ्यांना फक्त सावज दिसते आणि त्याला नेम साधायचा असतो, पण वन्यप्राण्यावर बेशुद्धीकरणाच्या प्रकरणात तज्ज्ञाला बंदुकीतून वन्यप्राण्याला कोणतीही इजा न करता त्याच्या मांडीवर नेम साधायचा असतो. त्यासाठी त्या प्रत्येक वन्यजीवाच्या वागणुकीची, शरीररचनेची पूर्ण माहिती आवश्यक असते आणि बाहेरुन आणलेल्या व्यक्तीला ही माहिती नसते.

ब्रम्हपुरीच्या प्रकरणात वन्यप्राणी थोडक्यात बचावला. एक सेकंदाचीही हालचाल झाली असती तर नेम मानेला लागून त्याच्या मृत्यूही ओढवला असता. विभागाकडे अशा प्रकारच्या मोहिमेसाठी साहित्य आहे की नाही, त्यासाठी लागणाऱ्या बंदुकीचे भाग नीट आहेत की नाही आदी बाबीही तपासून पाहायला हव्यात. युद्ध दररोज होत नसले तरीही युद्धाचा सराव केला जातो. त्याच धर्तीवर वनखात्याच्या यंत्रणेला सज्ज व्हावे लागेल. मात्र, ब्रम्हपुरीच्या प्रकरणात वनखात्याच्या सज्जतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

मार्गदर्शक तत्त्वांचे पालन आवश्यक

गोंदिया जिल्ह्यत जानेवारी २०१३ मध्ये वाघाने नवेगावच्या जंगलात आणि केरळमध्ये बिबटय़ाने घातलेला धुमाकूळ, यात माणसांचे बळी गेल्यानंतर केंद्रस्तरावरील यंत्रणा जागी झाली. या दोन्ही घटनांमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीनंतर अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी ‘मानक कार्य पद्धती’ अंतर्गत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली. यात मानव-वन्यजीव संघर्ष परिस्थिती हाताळण्यासाठी मुख्य वन्यजीव रक्षक, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचा प्रतिनिधी, पशुवैद्यकीय अधिकारी, स्थानिक गैरसरकारी संस्थेचा प्रतिनिधी, वनपरिक्षेत्र अधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी, स्थानिक पंचायत, पोलीस प्रशासन यांचा सहभाग असलेली एक समिती त्वरित गठित करण्यास सांगण्यात आले आहे. संघर्षांच्या परिस्थितीत निर्णयाचे अधिकार या समितीला राहतील.

अशा घटनांमध्ये स्थानिकांचा जमाव तयार होतो आणि परिस्थिती हाताळणे कठीण जाते. अशा वेळी जिल्हा प्रशासन जमावबंदीचे आदेश लागू करु शकतात. वाघ किंवा बिबटय़ाला पकडण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यास पशुवैद्यक तज्ज्ञांचा चमू सोबत असणे आवश्यक आहे. हा चमू त्या वन्यप्राण्याला बेशुद्ध करण्यास मदत करेल.

बेशुद्धीकरणानंतर तो वन्यप्राणी शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त असेल तर गठीत समितीच्या परवानगीनंतरच त्याला ‘रेडिओ कॉलर’ करुन उपयुक्त जंगलात सोडावे. मात्र, ज्या जंगलक्षेत्रात आधीच एखाद्या नर वाघाचा अधिवास असेल किंवा जवळपास मानवी वस्ती असेल तर प्राधिकरणाला सूचना दिल्याशिवाय त्याला तिथे सोडू नये असेही या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद आहे.

मानव-वन्यजीव संघर्षांच्या परिस्थितीत किंवा वन्यप्राणी अडचणीत असताना त्याला पिंजऱ्यात घेण्याआधी बेशुद्ध करावे लागते. त्यासाठी वनखात्यात वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणसुद्धा दिले जाते. मात्र, प्रशिक्षण घेऊन भागणार नाही तर त्याची नियमित उजळणी आवश्यक आहे. शिवाय इतर खात्यांप्रमाणे ‘मॉक ड्रील’ चाही अवलंब वनखात्याने करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तीला या संपूर्ण गोष्टीचे ज्ञान, कर्तव्याची जाण, कृतीमागील उद्देशाची जाण आणि या कार्याची आवड असेल, तरच वन्यप्राण्याला कोणतीही इजा न होता त्याच्या बेशुद्धीकरणाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली जाऊ शकते.

किशोर मिश्रीकोटकर, निवृत्त विभागीय वनाधिकारी

एक किंवा दोन दिवसांच्या प्रशिक्षणातून कुणीही तज्ज्ञ होत नाही, तर त्याला महिना-दोन महिन्याचे प्रशिक्षण आवश्यक आहे. या प्रशिक्षणानंतरही घेतलेल्या प्रशिक्षणाचा अधूनमधून सराव आवश्यक आहे. तज्ज्ञ सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची मदत घेतली जाऊ शकते. या सर्व प्रक्रियेत बंदुकीचा वापर करावा लागतो आणि त्यासाठी सरावच आवश्यक आहे. थोडाही नेम चुकला तर वन्यप्राण्याच्या मृत्यूची भीती असते. त्यामुळे अशा प्रकरणात आधी वन्यप्राण्याची ओळख करणे, दररोज तो वन्यप्राणी कोणत्या ठिकाणी जनावरे मारतो, त्यानंतर कोणता वन्यप्राणी कुठे हेही पाहणे आवश्यक आहे.

किशोर रिठे, ज्येष्ठ वन्यजीव तज्ज्ञ