पालकमंत्र्यांचे निर्देश

नागपूर :  जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हयातील ज्या खासगी रुग्णालयांनी प्रशासनाकडे प्रस्ताव दिले आहेत त्यांना तात्काळ परवानगी द्या, सहकार्य न करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या  बैठकीत राऊत यांनी कोविडसह  कायदा व सुव्यवस्था, रेमडेसिवीरच्या किं मतीचाहीआढावा घेतला, केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे या बैठकीत सहभाग घेतला.  यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते       डॉ. राऊत यांनी जिल्हयातील प्रमुख औषध विक्रेते व उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत दूरदृष्यप्रणालीद्वारे चर्चा केली. यामध्ये रुग्णांना शासकीय दरामध्येच रेमडिसीवर उपलब्ध करुन द्यावे. लोकांच्या जिविताचा प्रश्न असल्याने औषध विक्रेत्यांनी मानवीय भावनेतून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.