शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत कॉपी करणाऱ्या एकूण ८९ विद्याथ्यार्ंवर कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. कॉपीचा हा आकडा परीक्षा व्यवस्थेत सुधारणा झाल्याचे दर्शवित असला तरी यातून काही नवे प्रश्न पुढे आले आहेत. कॉपीचे कमी झालेले प्रमाण हा अचानक झालेला बदल आहे, कॉपीबाबत केलेली जनजागृती आहे की शिक्षण मंडळाने बदनामी टाळण्यासाठी राबविलेला छुपा कार्यक्रम आहे? याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

शिक्षण मंडळातर्फे यंदा कॉपी करणाऱ्या ८९ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. ही बाब कॉपीत नेहमीच अग्रेसर असणाऱ्या नागपूर मंडळाच्या बाबतीत दिलासा देणारी आहे. या मंडळाचा यापूर्वीचा कॉपी प्रकरणाचा आलेख नेहमीच उंचावलेला राहिला आहे. विशषेत: गोंदिया आणि भंडारा जिल्ह्य़ात ही संख्या जास्त असते. मराठी मातृभाषेच्या विषयाच्या परीक्षेतही  मोठय़ा प्रमाणात कॉपी करणारे पकडले जातात. या पाश्र्वभूमीवर यंदाची संख्या ही दिलासा देणारी असली तरी शंका उपस्थित करणारीही आहे.

गेल्यावर्षीचा काही वर्षांचा अनुभव बघता मंडळाने यावर्षी भरारी पथकांची संख्या वाढविली. यावेळी बारावीच्या व दहावी ४० च्यावर संवेदनशील केंद्र घोषित करण्यात आले असताना त्यातील बहुतांश केंद्रावरच कॉपीचे प्रकार आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली असली तरी प्रत्यक्षात मंडळाच्या नोंदीमध्ये ही संख्या कमी आहे. बारावीची परीक्षा शेवटच्या टप्प्यात असून दहावीचे पाच पेपर शिल्लक राहिले आहेत. यावेळी दहावीच्या परीक्षेत चंद्रपूर नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्य़ात एकही कॉपी करणारा विद्यार्थी पकडण्यात आला नाही. शिवाय दरवर्षी तोतयेगिरीचे प्रमाण असताना यावेळी ते प्रमाणसुद्धा शून्य आहे. यावर्षी आतापर्यंत बारावीच्या परीक्षेत भंडारामध्ये ६, चंद्रपूर २, नागपूर ६, वर्धा २३, गडचिरोली ३ आणि गोंदियामध्ये १४ विद्यार्थ्यांना तर दहावीच्या परीक्षेत भंडारा २, वर्धा ३ गोंदिया २९ विद्यार्थी पकडण्यात आले आहे.

कॉपीचे प्रमाण कमी -चव्हाण

या संदर्भात मंडळाचे सहसचिव राम चव्हाण यांनी सांगितले, प्रत्येक जिल्ह्य़ात मुख्याध्यापकांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या.  मुख्यध्यापकांनी शाळांमधून जागृती केली. यावेळी शाळेतून प्रात्याक्षिकचे ३० गुण मिळत असल्यामुळे आणि १५ गुण मंडळाकडून दिले जात असल्यामुळे तसाही विद्यार्थी उत्तीर्ण होतो, अशी जागृती करण्यात आली. त्यामुळे कॉपीचे प्रमाण कमी झाले आहे. शिवाय केंद्रावर विविध भरारी पथकाने जाऊन कॉपीबाबत कडक धोरण अवलंबिले असल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून कॉपीचे प्रमाण कमी झाले. बारावीची परीक्षा लवकरच संपणार असून दहावीचे पाच पेपर राहिले आहेत. महत्त्वाचे पेपर झाल्यामुळे यावर्षी कॉपीचे प्रमाण कमी राहील.