नशीब बलवत्तर म्हणून प्रवासी वाचले

खापरी डेपोतून पेट्रोल भरून वितरणासाठी शहरात येत असताना भारत पेट्रोलियमच्या अनियंत्रित टँकरने रहाटे कॉलनी चौकात थांबलेल्या वाहनांना मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. यात नऊ वाहने चिरडली जाऊन पाच ते सहाजण जखमी झाले. नशीब बलवत्तर म्हणून वाचलो, अशी प्रतिक्रिया अनेकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
२०१३ साली पुणे येथे संतोष माने याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस चोरून सुसाटपणे रस्त्यांवर दामटली आणि ९ जणांचे बळी घेतले होते. असाच काहीचा अनुभव कालच्या रहाटे कॉलनी चौकातील अपघाताच्या वेळी सर्वसामान्य नागपूरकरांना आला. आठवडय़ाचा पहिला दिवस असल्याने सकाळी १०.३० च्या सुमारास शासकीय कर्मचारी कार्यालयात जात होते. इतक्यात मागून येणाऱ्या एमएच-३१, सीक्यू २ -१६३० क्रमांकाच्या टँकरने ९ वाहनांना धडक दिली. यात एस.टी. बस, एक ऑडी कार आणि इतर चार चाकी वा दुचाकींचा समावेश आहे. रहाटे कॉलनीतील घटनेची माहिती बसचालक गणपत हनुमंत नायडू यांनी पोलिसांना दिली. यानंतर धंतोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून टँकरचालक राजेश गंगाधर जामो (३५) रा. रामेश्वरी यास अटक केली. यावेळी तो दारूच्या नेशेत असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी करीत आहेत. ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडल्याचे बयाण त्याने पोलिसांना दिले.
‘आऊटर रिंगरोड’ अपूर्ण
‘आऊटर रिंगरोड’चे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. दक्षिणेतील आऊटर रिंगरोडचा केवळ २५ टक्के वापर करण्यात येत आहे. तर उत्तरेकडील आऊटर रिंगरोडचे ५० टक्के काम अपूर्ण आहे. त्यामुळे जड वाहने अंतर्गत रिंगरोडवरून धावतात.
आऊटर रिंगरोडचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व जड वाहने शहराबाहेरूनच वळविता येतील. नरेंद्रनगर आणि राहाटे कॉलनी या परिसरात अत्यंत जादा वाहतूक असल्याने त्या ठिकाणी वाहतूक हवालदारांच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रित करण्यात येते. परंतु सोमवारी घडलेली घटना अतिशय गंभीर असून वाहतूक पोलिस अशा घटना टाळण्यासाठी प्रयत्नरत असल्याची प्रतिक्रिया वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त भारत तांगडे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.