पाणी कपात सुरू झाल्याने कुठे टँकरचा आधार, कुठे विहिरीने तहान भागवली

एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयाची अंमबलजावणी बुधवारपासून सुरू होताच पहिल्याच दिवशी अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागली. पश्चिम नागपुरातील मानवतानगर भागात टँकरने लोकांची तहान भागवली तर मध्य नागपुरात जुन्या विहिरींवरून काही लोकांनी पाणी भरले.

उद्या पाणी मिळणार असले तरी शुक्रवारचे काय, या चिंतेने अनेकजण ग्रासलेले दिसले. मंगळवारी पाणी भरून न ठेवल्याने सकाळी नोकरीवर गेलेल्या दाम्पत्यांचे प्रचंड हाल झाले.

वंजारीनगर, म्हाळगीनगर, सक्करदरा, पांडे लेआऊट, त्रिमूर्तीनगर, लक्ष्मीनगर, धरमपेठ या भागात पाणी न मिळाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. काही नागरिकांनी मंगळवारी पाणी साठवून ठेवले होते. पण ज्यांना विसर पडला त्यांना सकाळपासूनच पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागले. भेंडे लेआऊट येथील अनेक निवासी संकुलातील टाक्या रिकाम्या झाल्या. तेथे खासगी टँकर बोलवावे लागले. भगवाननगर, मानेवाडा, रेशीमबाग येथील वस्त्यांमध्ये नागरिकांची पाण्यासाठी भटकंती दिसून आली. मानवता नगरात तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होता. लहान मुलांना घेऊन महिला पाणी भरण्यासाठी टँकरच्या रांगेत लागल्या होत्या. दत्तात्रयनगरात काही भागात पाणीपुरवठा सुरू होता. तेथून पाणी नेण्यासाठी दूरवरून नागरिक येत होते. तरुणांनी दुचाकीवर भांडी ठेवून पाणी भरले. पाणी कपातीची माहितीच नसल्याने अनेकांची तारांबळ उडाली. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी वंजारीनगर पाण्याच्या टाकीवर पाणी भरण्यासाठी त्या भागातील नागरिक आले. मात्र, पुरवठा बंद असल्याने त्यांनी दुसरीकडे धाव घेतली.

रुग्णालयातील शस्त्रक्रिया स्थगित

पाणी कपातीच्या पहिल्याच दिवशी शहरातील शासकीय रुग्णालयाची स्वच्छता यंत्रणा कोलमडली. मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील काही किरकोळ शस्त्रक्रिया स्थगित झाल्या. बुधवारी मेडिकलला सकाळच्या सत्रात सुमारे सव्वाचार लाख लिटर पाणीपुरवठा झाला, परंतु मेयोला एकही थेंब पाणी मिळाले नाही. डागामध्ये संग्रहित पाण्याच्या आधारे अतिदक्षता विभागात सकाळी स्वच्छता करण्यात आली.  मेयोच्या नेत्रविभागात एकही शल्यक्रिया झाली नाही. अस्थिरोग, शल्यक्रिया विभागात कमी शल्यक्रिया झाल्या. मेडिकलच्या प्लास्टिक शल्यक्रिया गृहासह नवजात शिशू केंद्रातही पाणी नसल्याचा फटका बसला.

पूर्वनियोजित कार्यक्रमांना फटका

एक दिवसाआड पाणीपुरवठय़ामुळे सर्वसामान्य नागरिकांकडील कार्यक्रमांचे नियोजनही बिघडले. जयप्रकाश नगरातील रहिवासी देशपांडे दाम्पत्यांकडे गुरुवारी सायंकाळी धार्मिक कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र, त्याच्या एकदिवसाआधी म्हणजे बुधवारी पाणीपुरवठा बंद. गुरुवारी सुरू झाला तरी तो सायंकाळी होणार, त्यामुळे सकाळच्या कार्यक्रमात तो उपयोगी पडणार नाही. त्यामुळे देशपांडे यांनी तीन दिवस आधीच पाणी साठवण्याचे नियोजन केले.

या भागांत पाणी

आशीनगर, सतरंजीपुरा आणि नेहरूनगर झोनमध्ये येणाऱ्या ५० टक्के भागात पाणीपुरवठा सुरू होता.

चाकरमान्यांचे प्रचंड हाल

पती-पत्नी नोकरीवर असणाऱ्या कुटुंबाची ‘एक दिवसाआड पाणी पुरवठय़ामुळे अडचण झाली आहे. एरव्ही नळ रोज येत असल्याने पाणी साठवणुकीची गरज नव्हती. आता पाणी साठवायचे कोठे हा प्रश्न आहे. आम्ही दोघेही नोकरी करणारे आहोत. दिवसभरात नळ कधी येणार हे कळायलाही मार्ग नाही. त्यामुळे पाणी साठवणुकीची व्यवस्था करावी लागेल किंवा समस्या सुटेपर्यंत पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागेल. कारण विहिरीचे पाणी खारट असल्याने ते पिण्याच्या उपयोगात येऊ शकत नाही, असे भेंडे लेआऊट येथील रहिवासी सीमा गोळे यांनी सांगितले.

नगरसेवकांवर रोष

एक दिवसाड पाणी येणार म्हणून रघुजीनगर आणि अयोध्यानगर परिसरात अपार्टमेंटधारकांनी मोठे ड्रम आणून त्यात पाण्याचा साठा करून ठेवला. अयोध्यानगर येथील राधेय या अपार्टमेंटमध्ये मंगळवारी रात्री तीन ड्रममध्ये पाणी साठवून ठेवले होते. त्यामुळे सकाळच्यावेळी साठवलेल्या पाण्याचा उपयोग केला. दुपारनंतर तेथील काही नागरिकांना साठवलेले पाणी मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी नगरसेवकांच्या माध्यमातून टँकरची मागणी केली मात्र त्यांना मिळाले नाही. त्यामुळे अपार्टमेंटमध्ये पाण्यावरून वाद होऊन  नगरसेवकांवर रोष व्यक्त करण्यात आला.

जलकुंभाचा सुरक्षारक्षक तहानलेला

वंजारीनगर जलकुंभावर तैनात सुरक्षा रक्षकालाही पिण्याचे पाणी मिळाले नाही. त्यांनी आपले गाऱ्हाणे पाणी भरण्यासाठी आलेल्या नागरिकांसमोर मांडले.

टिल्लू पंप वापरणाऱ्यांवर कारवाई

शहरातील विविध भागात अवैधपणे टिल्लू पंपाचा उपयोग करत असताना गेल्या तीन महिन्यात ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सच्यावतीने २३० लोकांवर कारवाई करण्यात आली. मात्र, शहरातील अनेक भागात आजही सर्रास टिल्लू पंपाचा वापर केला जात आहे. शिवाय अनेक ठिकाणी पाण्याची गळती सुद्धा सुरू आहे. शहरात सध्या ६५० एमएमडी पाणीपुरवठा होत असताना त्यात ५३ टक्के पाणी वाया जात असल्यामुळे ही पाण्याची भरपाई महापालिका पूर्ण कशी करेल, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

३२ हजार अवैध जोडण्या

शहरातील विविध भागात ३२ हजार अवैध नळ जोडण्या आहेत. दोन महिन्यात २ हजार नळजोडणी धारकांवर  कारवाई करण्यात आली आहे. झोन क्र. एकमध्ये ३२२, झोन क्र.२ मध्ये ४२२,  झोन क्र. ३ मध्ये ३४०,  झोन क्र. ४ मध्ये ३५७,  झोन क्र.५मध्ये ३८०, झोन क्र. ६ मध्ये ३६०, झोन क्र. ७ मध्ये ३४८, झोन क्र. ८ मध्ये ३३२, झोन क्र. ९ मध्ये ३५०, झोन क्र. १० मध्ये ३१०. अवैध नळ जोडण्या आहेत.

३१४ विहिरी दूषित

शहरातील ७५५ पैकी ४४१ विहिरींची सफाई झाली आहे. ३१४ विहिरी दूषित आहेत. शहरात ५२५४ जुन्या बोअरवेल असून २७७ नवीन बोअरवेल तयार करण्यात आल्या आहेत. पूर्व, उत्तर, मध्य व दक्षिण नागपूरमधील वस्त्या बोअरवेलवर अवलंबून आहे.

१४० तक्रारी

विविध झोनमधील जलप्रदाय विभागात १४० तक्रारी आल्या. बहुतांश ठिकाणी टँकरची मागणी करण्यात आली मात्र, कुठेही प्रशासनाने टँकर पाठवले नाही, असे जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी सांगितले.