सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

जीवनात काही नाही केले तरी चालेल, मात्र चांगले मित्र जोडणे आवश्यक आहे. त्यात  दोघांची मने जुळली तर कामे यशस्वी होत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून संघाचे काम करत असताना त्यातून माणसे जोडून व त्यांना कामाला लावून लोकोपयोगी काम करून घेतली जातात. यातून काम करणाऱ्याला आणि आपल्याला मानसिक समाधान लाभत असते. भारतीय मानसशास्त्राचा हा एक भाग असून त्याचा अभ्यास करण्याची आज गरज आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

नचिकेत प्रकाशनतर्फे  मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पल्लवी जोशी-गायकवाड यांच्या मन आणि आपण या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. रामनगरातील शक्तीपीठच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर, प्रकाशक अनिल सांबरे, लेखिका डॉ. पल्लवी जोशी-गायकवाड उपस्थित होते.

माणसांनी माणसासोबत माणसासारखे वागले पाहिजे आणि तसे वागले नाही तर मनुष्य जात ही जगात टिकू शकत नाही. मनुष्याचे मन त्यांनी स्वत:च बनविले असते. मात्र, तेच मन जर नीट हाताळले नाही तर त्याची उन्नती होते आणि तेच त्याला त्रासदायक सुद्धा ठरू शकते. मी किंवा माझे असा मनुष्याचा स्वभाव असतो आणि त्यातून अंहकार निर्माण होत असतो. मात्र अहंकार फार काळ टिकत नाही. सकारात्मक दृष्टीने विचार केला तर अहंकार आडवा येत नाही. त्यावर उपाय म्हणजे एकमेकाबद्दल आत्मीयता असणे आवश्यक आहे.

जोशी यांच्या पुस्तकात मानसशास्त्रीय दृष्टीने अनेक उदाहरणे दिली असली तरी भारतीय मानसशास्त्राचा मनुष्याच्या विविध पैलूचा विचार करून त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि ते काम लेखिका यशस्वीपणे करेल असा विश्वास भागवत यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. चैतन्य शेंबेकर यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे संचालन शिल्पा नंदनपवार यांनी केले.