टाटा ट्रस्ट आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूटमध्ये करार; रुग्णांच्या उपचारासाठी जागतिक दर्जाची सोय होणार

टाटा ट्रस्ट आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूट (एनसीआय)मध्ये शनिवारी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी  करण्यातआली. त्यानुसार ‘एनसीआय’ला टाटा ट्रस्ट जागतिक दर्जाचे संशोधन व उपचाराचे तंत्र उपलब्ध करेल. दोन्ही संस्था विदर्भात कर्करुग्णांच्या उपचारासाठी काही सॅटलाईट केंद्रांची उभारणी करून येथील कर्करुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार उपलब्ध करून देणार आहेत.

विदर्भातील कर्करुग्णांच्या उपचाराचा दर्जा उंचावण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टाटा ट्रस्टकडून विश्वस्थ आर. व्यंकटरमणन यांनी तर एनसीआयच्यावतीने सरचिटणीस शैलेश जोगळेकर यांनी स्वाक्षरी केली. करारानुसार एननसीआय रुग्णालयातील उपचाराचे तंत्र वेळोवेळी अद्यावत करण्यासह उपचाराचा दर्जा उंचवण्यासाठी टाटा ट्रस्ट मदत करेल. सोबत विदर्भातील कर्करूग्णांना उपराजधानीत यायला विलंब होत असल्याने उपचाराचा वेळ कमी करण्यासाठी काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा इतर रुग्णालयांशी सामंजस्य करार करून तेथे कॅन्सरचे सॅटलाईट केंद्र उभारले जाईल. गडचिरोली, चंद्रपूरसारख्या मागास जिल्ह्य़ांना त्यात प्राधान्य असेल.

या केंद्रात कर्करोगाचे अचूक निदान व उपचाराच्या सेवा उपलब्ध करण्यासाठी  १०० कोटी रुपयांची मदत टाटा करेल. या निधीतून एनसीआयसह सॅटलाईट केंद्रांमध्ये कर्करुग्णांच्या उपचारासाठी महागडी अद्यावत उपकरणांसह इतर यंत्रणा उभारली जाईल. या सर्व केंद्रांनाही राष्ट्रीय कॅन्सर ग्रीडशी जोडले जाईल. ही केंद्र निश्चित करण्यासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागेल. या यंत्रणेतून विदर्भातील कर्करुग्णांची विविध उपचाराबाबतची प्रतीक्षा यादी कमी होवून रुग्णांना लाभ होईल.  याप्रसंगी रतन टाटा ट्रस्ट आणि अलाईड ट्रस्टचे मुख्य वित्तीय अधिकारी आशिष देशपांडे, एनसीआयचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनील मनोहर, टाटाच्या शैक्षणिक विभागाचे कैलाश शर्मा, एनसीआयचे संचालक डॉ.आनंद पाठक उपस्थित होते.

गरीब रुग्णांना लाभ -मुख्यमंत्री

उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळतात. कर्करोगावरील उपचार दीर्घकाळ चालतात. त्यात मोठा खर्च होतो. हा खर्च माफक नसल्यास कुटुंबच उध्वस्त होते. सध्या उपचाराच्या सुविधा अल्प आहेत. त्यामुळे टाटाच्या मुंबईतील रुग्णालयावर देशाच्या विविध भागासह विदेशातील रुग्णांचाही भार आहे. हा भार कमी करून रुग्णांना चांगला उपचार मिळावा म्हणून करार महत्वाची भूमिका बजावेल. एनसीआयमध्ये जागतिक दर्जाचे उपचार मोफत किंवा माफक दरात उपलब्ध असल्याने गरीबांनाही मुंबईसह मोठय़ा शहरात न जाता येथेच उपचार  उपलब्ध झाला आहे. येथे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार होणार असल्याने त्याचाही रुग्णांना लाभ होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी व्यक्त केले.

टाटाचे सात राज्यांमध्ये काम – आर. वेंकटरमणन

टाटा ट्रस्ट वेगवेगळ्या राज्यांशी करार करून कॅन्सरवरील उपचाराचा दर्जा सुधारण्यासाठी काम करत आहे. गेल्या महिन्यात टाटाने आसामशी करार करून तेथील १९ रुग्णालयांमध्ये अद्ययावत उपचाराची यंत्रणा उभारण्यासाठी मदतकेली आहे. टाटाकडून महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, ओरिसा, तेलंगणासह इतरही काही राज्यांशी करार करण्यात आले आहेत, अशी माहिती टाटा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्थ आर. व्यंकटरमणन यांनी दिली.