अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण असह्य़ होत असून त्यामुळे शिक्षकही चिंतित आहेत. त्याचे प्रतिबिंब पालक तसेच शिक्षकांच्या चर्चेतून उमटत असल्याचे दिसून येत आहे.

जसजशी बारावीची परीक्षा जवळ येत आहे, तसे विद्यार्थ्यांमध्ये अनेक बदल जाणवतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण असह्य़ होत असून गेल्या काही वर्षांमध्ये अर्धा अभ्यासक्रम आटोपत आला की ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दररोज एक तरी विद्यार्थी अभ्यास झेपत नाही, शिकवणी वर्गात काही कळत नाही, विज्ञान किंवा वाणिज्य शाखा बदल करायची आहे, या कारणासाठी शिक्षकांना भेटतात. त्यांना शांत करून त्यांचे समुपदेशन करणे हल्ली शिक्षकांसाठी  नित्याची बाब झाली, असे बारावीच्या शिक्षकांचे म्हणणे आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये हे प्रकार फारच वाढीला लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे असे विद्यार्थी घरी न सांगण्याची अट शिक्षकांना घालत असतात. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मध्यस्ताची भूमिका वारंवार शिक्षकांना पार पाडावी लागत आहे.

खासगी शिकवणी वर्गही जबाबदार

दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली की, अकरावी व बारावी या दोन्ही शैक्षणिक वर्षांसाठी पालक लाखो रुपये शिकवणी वर्गावर खर्च करतात. मात्र, परीक्षा तोंडावर आल्यावर विद्यार्थी परीक्षा देत नाहीत किंवा अभ्यास झेपत नाही, असे कारण सांगू लागतो. तेव्हा पालक झालेल्या खर्चाचे दाखले देऊन मुलांची कानउघाडणी करतात. शिवाय मुलांनाही पालकांनी केलेल्या खर्चाची कल्पना असते. त्यामुळे सध्या कुमारवयीन मुलांमध्ये निराशेचे विचार मनात येतात. त्याला खासगी शिकवणी वर्गही जबाबदार आहेत, असे धरमपेठ विज्ञान महाविद्यालयाचे शिक्षक डॉ. युगल रायलू म्हणाले.