देवेश गोंडाणे

राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून ९ ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. शाळांच्या निर्जंतुकीकरणाची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर सोपवण्यात आली आहे. मात्र, शिक्षण विभागाचा हा निर्णय म्हणजे आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकण्याच प्रकार असून शाळांकडे चतुर्थश्रेणी कर्मचारी नसल्याने दैनंदिन निर्जंतुकीकरण कोण करणार, शिक्षकांची करोना चाचणी होईल, विद्यार्थ्यांचे काय, असा सवाल संस्थाचालकांची उपस्थित केला असून शाळा सुरू करण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने त्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय शाळा सुरू न करण्याचा निर्णय राज्य सरकारला कळवला आहे.

महामंडळाचे कार्यवाह रवींद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शाळा सुरू करण्याच्या विषयावर संस्थाचालकांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळा सुरू करण्यासाठी संस्थांसमोर असलेल्या विविध अडचणींवर चर्चा झाली. राज्य सरकारने करोनानंतर शाळा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असला तरी संस्थाचालकांनी त्यामध्ये खोडा निर्माण केल्याने नवा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा सुरू करण्याला शाळा व्यवस्थापनाचा विरोध नाही. परंतु शासनाच्या आदेशावर आक्षेप घेण्यात आला आहे. शाळांच्या निर्जंतुकीकरणाची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर दिली असली तरी शाळांमध्ये रोजचे निर्जंतुकीकरण कोण करणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. शिवाय वर्गखोल्यांच्या नियमित तर शौचालयांचे दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण करायचे आदेश आहेत. याची जबाबदारी कोण स्वीकारेल, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.  शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी नाहीत. शिवाय भौतिक सुविधाही नाहीत. त्यामुळे प्रशासनाने सॅनिटायझर दिले तरी ते करणार कोण, अशी अडचण शाळांनी उपस्थित केली आहे. शिवाय पालकांकडून संमती पत्र मिळणे अनिवार्य आहे. मात्र, अद्यापही पालकांनी संमती पत्र दिलेले नाहीत. अशा विविध समस्यांवर शासनाने तोडगा काढल्याशिवाय शाळा सुरू करणे अशक्य असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने म्हटले आहे. विशेष म्हणजे, राज्य शिक्षण मंडळासह  मुख्याध्यापक संघ, राज्य शिक्षक परिषद, शिक्षक भारती, विजुक्टा, भाजप शिक्षक आघाडी या संघटनांनीही या निर्णयाला समर्थन दिले आहे.

विद्यार्थ्यांच्या चाचणीसंदर्भात सूचना नाही

शाळा कर्मचाऱ्यांची करोना चाचणी झाल्यानंतरच त्यांना शाळेत येता येणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या चाचणीसंदर्भात कुठल्याही सूचना नाही. त्यामुळे शाळेत येणारे विद्यार्थी  करोनाग्रस्त असल्यास काय, त्यांना करोना आहे किंवा नाही, याची खातरजमा कशी करावी याबाबत शासनाकडून कुठलीही स्पष्टता देण्यात आली नाही. त्यामुळे सरकारने आधी हा संभ्रम दूर करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

कला, वाणिज्य शाखांबाबतही अस्पष्टता

शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार चार तासांची शाळा ठेवून इंग्रजी, विज्ञान आणि गणित विषयाचे वर्ग घ्यायचे आहेत. इतर वर्ग हे ऑनलाईन घ्यायचे आहेत. त्यामुळे कला आणि वाणिज्य शाखांच्या विद्यार्थ्यांचे काय, यावर कुठेही स्पष्टता नाही. त्यामुळे हा संभ्रम दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.