29 January 2020

News Flash

एकाच जिल्ह्य़ातील नेमणुकीसाठी पती-पत्नी शिक्षकांचे उपोषण

३०० जिल्हा परिषद शिक्षकांनी पत्नीसह एकाच जिल्ह्य़ात बदली करा, या मागणीसाठी बेमुदत उपोषण आरंभिले आहे.

राज्यातील १२ हजार तरुण शिक्षकांना गैरसोयीच्या झळा
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांच्या पत्नी अमृता यांची मुंबईला बदली करण्यात आली. मात्र, वर्षांनुवर्षे ज्ञानदान करणाऱ्या महिला व पुरुष शिक्षकांना कुटुंब असतानाही जबरदस्तीने घटस्फोट घडवून आणल्याप्रमाणे कौटुंबिक वादाचे चटके सहन करावे लागत आहेत. त्याचा परिणाम म्हणून अनेकांना निराशेने ग्रासले आहे. काहींचे घटस्फोट, कुणाला पक्षघात, तर अनेकजण व्यसनाधीन होऊन उद्ध्वस्त कुटुंबाचे जीवन जगत आहेत. अशा उद्ध्वस्त कुटुंबाच्या झळा राज्यातील १२ हजार तरुण शिक्षकांना सहन कराव्या लागत आहेत. त्यातील ३०० जिल्हा परिषद शिक्षकांनी पत्नीसह एकाच जिल्ह्य़ात बदली करा, या मागणीसाठी बेमुदत उपोषण आरंभिले आहे.
पती-पत्नीला एकाच जिल्ह्य़ात नोकरी असावी, असा शासन निर्णय आहे. त्याचे ज्वलंत उदाहरण मुख्यमंत्र्यांच्या रूपाने दिसून येते. त्यांची पत्नी नागपुरातील अ‍ॅक्सिस बँकेत नोकरीला होती. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि पत्नीलाही मुंबईला ताबडतोब बदली मिळाली. कायद्यासमोर सर्व समान असताना मुख्यमंत्र्यांना एक आणि सामान्यांना वेगळा न्याय दिला जात आहे. मुख्यत्वे ओबीसी, एससी, एसटी, भटके, आदिवासी पती-पत्नी एकत्र कुटुंबात नांदू शकत नसल्याने त्यांना मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि कौटुंबिक व्याधींनी व्यापले असल्याची भावना अध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, महिला शिक्षक लातुरला आणि पती धुळ्याला असतो. धुळ्याहून लातूरला बदली करण्यासाठी त्याच प्रवर्गातील उमेदवार बदलीसाठी इच्छुक असला तरच बदली शक्य होते.
अन्यथा वर्षांनुवर्षे शिक्षक घटस्फोटीतांचे आयुष्य जगत आहेत. एक दोन नव्हे तर १५ ते १८ वर्षांनुवर्षे शिक्षक एकाच ठिकाणी खिचपत पडले आहेत. मी लातूरला आणि पत्नी लहान बाळाला घेऊन धुळ्यातील आदिवासी भागात राहते. माझे सासरे काही दिवस पत्नीकडे होते. मुलीचे आणि नातीचे हाल पाहून ते मानसिक रोगी झाले. त्यांना वेडय़ाच्या रुग्णालयात दाखल करावे लागले.
ऐनवेळी एखादी कौटुंबिक समस्या उद्भवली तर ६०० किलोमीटरवरून मी कुटुंबाची काहीही मदत करू शकत नाही, अशी खंत पिट्टलवाड यांनी व्यक्त केली.
मिरासदार हे लातरूच्या जिल्हा परिषद शाळेत असून अपंग आहेत. त्यांना पत्नी नाही. त्यांच्या वडिलांना पक्षाघात झाला आहे तर तरुण मुलाने आम्ल प्यायल्याने परगावाहून त्याच्यासाठी मदतीला येणे फारच त्रासदायक झाले होते. कुटुंबाकडे बघायचे की शाळा बघायची. तरुण शिक्षकांचे प्रश्न सोडवले नाहीत, तर ते वेडे होतील.
अनेकजण तर नशेच्या आहारी गेले आहेत. असे अभावात जीवन जगत असताना शाळेत गुणवत्ता कशी द्यायची, असे प्रश्न तरुण शिक्षकांनी उपस्थित केले आहेत. या उपोषणाने तरी सरकारला जाग येईल, अशी आशा आंदोलनकर्त्यां शिक्षकांना आहे.

First Published on December 11, 2015 2:21 am

Web Title: teachers husband and wife hunger on strike for appointment in same district
टॅग Teacher
Next Stories
1 सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लोकसंख्येशी ताळमेळच नाही
2 स्मार्ट सिटीच्या वाटेवर घनकचऱ्याचा राक्षस
3 ‘होमिओपॅथी व आयुर्वेदा’चेही संशोधन व उपचार केंद्र हवे
Just Now!
X