थकित वेतनासाठी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांसोबत शाब्दिक चकमक

नागपूर महापालिकेसह नगरपालिकांमधील शिक्षकांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन न झाल्यामुळे संतप्त शिक्षकांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेसह इतर संघटनेच्या बॅनरखाली शिक्षण उपसंचालक कार्यालयात आंदोलन केले. भाजप समर्थित शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आणि माजी आमदार नागो गाणार यांनी अचानक तेथे येऊन सरकारचा धिक्कार करत सरकारविरोधी नारे दिल्याने सगळेच शिक्षक स्तब्ध झाले. आंदोलकांनी, अहो तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आहात, अशी आठवण करून दिल्यावर त्यांची आंदोलकांसोबत शाब्दिक चकमक उडाल्याने ते येथून निघून गेले.

विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीत आता रंग भरू लागला आहे. या निवडणुकीसाठी १६ उमेदवारांनी अर्ज केला असून शिक्षकांच्या जवळ जाण्याची एकही संधी कुणीही सोडायला तयार नाही.

निवडणुकीत सहभागी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेसह महापालिकाच्या शिक्षक संघटनेने शनिवारी नागपूरच्या शिक्षणउपसंचालक कार्यालयात आंदोलन केले. त्यात महापालिका व नगरपालिकांच्या शिक्षकांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन आणि सहाव्या वेतन आयोगाची थकबाकीही देण्यात आलेली नाही, हा मुद्दा लावून धरण्यात आला.

शेकडो शिक्षक सहभागा झालेल्या आंदोलनाला दुपारी ३ वाजता सुरुवात झाली. अचानक ४ वाजताच्या सुमारास भाजप समर्थित शिक्षक संघटनेचे उमेदवार व माजी आमदार नागो गाणार व त्यापूर्वी आमदार अनिल सोले आंदोलनस्थळी पोहचले. नागो गाणार यांनी अचानक बोलायला सुरुवात करून शिक्षकांचे तीन महिन्यांपासून वेतन न होणे, हे दुदैवी असून हे शिक्षकविरोधी सरकार असल्याचा आरोप करत सरकारविरोधात नारे दिले. गाणार शासनाच्या विरोधात बोलत असतांना आंदोलकांकडून शेम. शेम.., असा प्रतिसादही दिला जात होता. दरम्यान, संतप्त आंदोलकांनी गाणारांना आपण सलग ६ वर्षे आमदार राहण्यासह दोन वर्षांपासून सत्ताधारी पक्षात असल्याची आठवण करून दिली.

सत्तेत असल्यावरही तुम्हाला प्रश्न सोडवता आला नसल्याचा चिमटाही त्यांनी काढला. त्यावर गाणार यांनीही शिक्षकांना एका महिन्याचे वेतन तातडीने देण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले, परंतु शिक्षकांनी हा प्रश्न विमाशिसंच्या संघर्षांने सुटल्याचे सांगितले. त्यानंतर आंदोलक संतप्त होत असल्याचे बघून आमदार अनिल सोले यांच्यासह नागो गाणार सुमारे २० मिनिटातच तेथून निघून गेले, परंतु सगळ्या शिक्षकांमध्ये गाणारांकडून सरकारविरोधी घोषणांसह शासनाच्या केलेल्या धिक्काराची चर्चा रंगली आहे. आंदोलनात शिक्षक संघटनांचे डॉ. दत्तात्रय मिर्झापूरे, प्रमोद रेवतकर, विठ्ठल जुनघरे, अविनाश बढे, ज्ञानेश्वर रेवतकर यांच्यासह बरेच मान्यवर उपस्थित होते.

अन्यायाविरुद्ध लढतच राहणार

तीन महिन्यांपासून वेतन न मिळणे हा शिक्षकांवर झालेला अन्यायच आहे. मी स्वत: शिक्षक असल्याने मला अशा प्रकारच्या अन्यायाची जाण आहे, त्यामुळेच त्यांच्यासाठी मी आंदोलन केले व पुढेही करीतच राहणार    – नागो गाणार, शिक्षक परिषदेचे उमेदवार