बैरामजी टाऊनमध्ये दोन ठिकाणी छापे

नागपूर : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात टाळेबंदी असून शाळा व शिकवणी वर्गावरही बंदी आहे. त्यानंतरही उपराजधानीत शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांना बोलीवून वर्ग घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.

बैरामजी टाऊन परिसरातील व्हीपीए व सीपीए कोचिंग क्लासेसमध्ये चार पाळीत ऑनलाईनसह विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात बसवून शिकवणी देत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनीता शाहू यांना मिळाली. त्यानंतर शाहू यांनी विशेष पथकाला छापा टाकण्याचे निर्देश दिले. शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक व सदर पोलिसांनी दोन्ही कोचिंग क्लासवर छापे टाकले. यावेळी दहा ते बार विद्यार्थी वर्गात आढळून आले. काही विद्यार्थ्यांनी मास्क घातले नव्हते. करोना नियमाचेही सर्रास उल्लंघन होत असल्याचे आढळले. पोलिसांनी महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाला माहिती माहिती दिली. शोध पथकाचे अधिकारी तेथे पोहोचले. त्यांनी व्यवस्थापकाविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. कोचिंग क्लास सील करण्याचे निर्देशही शाहू यांनी दिले. दोन्ही कोचिंग क्लासचे व्यवस्थापक व संबंधित व्यक्तींविरुद्ध साथरोग कायद्यासह विविध कलमान्वये सदर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.