करोना संशयिताचे नमुने फेकण्याची चौकशी

नागपूर : मेडिकल  आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या मधील मैदानात करोना संशयितांचे नमुने ७ जूनला फेकलेल्या अवस्थेत आढळल्याचे लोकसत्ताने पुढे आणले होते. त्याची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) एक पथक बुधवारी मेडिकलला धडकले. त्यांनी येथील विविध विभागांना भेट देत तपासणी केली. हे नमुने त्यांना महापालिकेच्या चालकाने येथे फेकल्याचे सांगण्यात आले.

या पथकाने येथे बायोमेडिकल वेस्ट- २०१६ कायदा आणि करोना मेडिकल वेस्टशी संबंधित नियमांचे काटेकोर पालन होते की नाही, याची पाहणी केली. त्यासाठी पथक प्रथम येथील करोना चाचणी होणाऱ्या प्रयोगशाळेत पोहचले. येथे त्यांनी नमुने गोळा करण्याची पद्धत व त्यानंतर त्याच्या वापरलेल्या कुप्यांसह इतर वापरलेल्या साहित्याची विल्हेवाट कशी लावली जाते, हे बघितले. त्यानंतर करोनाशी संबंधित  वार्डाला भेटी देत  माहिती घेतली. नमुने आढळलेल्या मैदानाचीही पाहणी केली. या पथकाने मेडिकलच्या वैद्यकीय अधीक्षक कार्यालयासह करोना तपासणी प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांना येथे कोविड वेस्ट आणि बायोमेडिकल वेस्टच्या प्रत्येक नियमांचे  पालन गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. सोबत महापालिकेने कुणाचे नमुने येथे तपासणीला पाठवले व ते नकारण्यात आल्यास त्याची विल्हेवाट येथेच झाल्यास योग्य राहणार असल्याचाही सल्ला दिला. या विषयावर एमपीसीबीच्या हेमा देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मेडिकलची बायोमेडिकल व कोविड वेस्ट व्यवस्थापनाची यंत्रणा निरीक्षणात चांगली आढळल्याचे सांगितले. सोबत या विषयाची माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.