* नागपूर – १२.९ अंश से. * बोचऱ्या वाऱ्यांमुळे हुडहुडी

शहराच्या किमान तापमानात कमालीचा चढउतार होत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी १६ अंश सेल्सिअसवर गेलेले किमान तापमान सोमवारी चक्क १२.९ अंश सेल्सिअपर्यंत खाली आले होते. तत्पूर्वी रविवारी मात्र पारा १२.४ वर गेला होता. चढउताराचा हा खेळ सातत्याने सुरू असला तरीही गेल्या दोन दिवसांपासून पहाटेच्या बोचऱ्या वाऱ्यांमुळे थंडीची चाहूल जाणवायला लागली आहे.

उपराजधानीतील हिवाळी अधिवेशन जवळ आले की राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होते. अधिवेशन पुढच्या महिन्यात आहे. राजकीय वातावरण तापण्यास अजून सुरुवात झालेली नाही. मात्र, थंडीचे चोर पावलाने आगमन झाल्यामुळे शहराच्या काही भागात शेकोटय़ा पेटू लागल्या आहेत. काही वर्षांपूर्वी हिरव्या शहरांच्या यादीत अग्रक्रमावर असलेल्या या शहरातील हिरवळ आता विकासाच्या गर्तेत कमी झाली आहे. तरीही सिव्हिल लाईन्स, नीरी, अंबाझरी या परिसरात दाट हिरवळीचे वर्चस्व आहे. त्यामुळे हिवाळ्याला सुरुवात झाली की, या परिसरात थंडीची चाहूल लागते. गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात चढउतार सुरू आहे. आठवडाभरापूर्वी १४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेले तापमान मधल्या काळात पुन्हा १६ अंशांवर गेले होते. रविवारी तापमान तब्बल दोन अंश सेल्सिअसने कमी होऊन १२.४ अंश सेल्सिअसवर आले. सोमवारी त्यात पुन्हा वाढ झाली आणि ते १२.९ अंश सेल्सिअसवर गेले. तापमानात चढउतार सुरू असला तरीही गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर मात्र वाढला आहे. सायंकाळी थंडी जाणवतच आहे, पण पहाटेच्या सुमारास देखील बोचरी थंडी पडू लागली आहे.

पाऊस कमी तर थंडीही कमी असा सर्वसामान्य नागरिकांचा अंदाज असतो, तर हवामानाच्या अभ्यासकांच्या मते पाऊस कमी पडला तरीही थंडी अधिक पडते आणि असे झाले देखील आहे. यावर्षी पाऊस कमी पडला आणि थंडीला तशी उशिराच सुरुवात झाली. तरीही थंडीचा जोर मात्र फेब्रुवारी अखेपर्यंत कायम राहील, असे अभ्यासकांचे संकेत आहेत. नागपूरपाठोपाठ गोंदियाचे देखील तापमान कमी झाले असून ते १२.६ अंश सेल्सिअसवर आले आहे. यवतमाळात सर्वात कमी म्हणजे १२.२ अंश सेल्सिअवर तापमान आहे.